नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्यामार्फत हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टींग, मिठाईची दुकाने, बेकरी, चिकन/ मटन शॉप इत्यादींसाठी स्वच्छता मानांकन ही ऐच्छीक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त अन्न आस्थापनांनी १३ डिसेंबर २०२३ पर्यंत सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक उ.सि.लोहकरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
स्वच्छता मानांकन हे स्वयंमुल्यांकन व त्रयस्थ पक्षाच्या ऑटीडद्वारे प्रमाणित करण्यात येते. या योजनेंतर्गत अन्न व्यवसायीकांना आस्थापनेमध्ये अन्न सुरक्षा विषयक करण्यात येत असलेल्या उपाययोजना व त्याचे पालन याबाबत ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याची संधी मिळते. त्यामुळे ग्राहकांना उच्च मानांकीत प्रमाणपत्र प्राप्त आस्थापनेमध्ये अन्न सुरक्षा विषयक नियमांचे पालन होत असल्याची हमी मिळते. सदर प्रमाणपत्र अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली मार्फत प्रदान करण्यात येते.
पात्र आस्थापनांनी आपले अर्ज अन्न व औषध प्रशासन विभाग, नाशिक सह आयुक्त कक्ष क्रमांक २१ व २३, ५ वा मजला, उद्योग भवन, आय.टी.आय. सिग्नलजवळ, त्र्यंबकेश्वर रोड, सातपूर, नाशिक 4220007 या पत्यावर १३ डिसेंबर २०२३ पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी उ.सि.लोहकरे, भ्रमणध्वनी क्रमांक 9423750839, वि.वि.पाटील, भ्रमणध्वनी क्रमांक 9850050325 यावर संपर्क साधावा. पात्र अन्न आस्थापनांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर स्वच्छता मानांकन करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक उ.सि.लोहकरे यांनी कळविले आहे.