नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मधील ब्रह्मगिरी कृषी सेवा अटल सहकारी संस्थेच्या माध्यमातून आत्मनिर्भर कृषी अभियानातून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी मदत, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे. नाशिक मधील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर, वनहक्क जमिनीवर, शासकीय पडीक जमिनीवर हिरव्या सोन्याची अर्थात बांबूची लागवड कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली करून शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी तसेच जमिनीची धूप थांबावी, पर्यावरण संरक्षण व्हावे, आंतरपिकातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व इंधन निर्मिती इत्यादी रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध व्हाव्यात हे उद्दिष्ट संस्थेने ठेवल्याची माहिती संस्थेचे प्रकल्प समन्वयक इंद्रजितसिंह घोरपडे यांनी दिली.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांबूच्या समावेश गवत वर्ग पीक लागवडीत केल्याने बांबूची लागवड आता शेतात आणि शेताच्या बांधावर करता येणार आहे. बांबूतोडीसाठी पूर्वीची सरकारी बंधने आता शासनाने काढून टाकलेली आहेत. बांबूच्या माध्यमातून कांदा चाळ साठवणूक, शेतमाल साठवणूक गोदाम, बांबू पासून अनंत प्रकारचे फर्निचर तयार करणे इत्यादीसाठी आमची ब्रह्मगिरी कृषी सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांचा बांबू सुद्धा विकत घेणार आहे.
बांबूचे जीवन चक्र ४० ते ५० वर्ष असते त्यामुळे दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही. कमी जास्त पाऊस झाला तरी नुकसान होत नाही. त्यामुळे दरवर्षी आठ ते दहा बांबूची रोपे आपोआप तयार होतात. पाणी साचणारी पाणथळ जमीन क्षारयुक्त मुरमाड जमीन इत्यादी जमिनीवर बांबूची लागवड करता येते. इतर पिकांच्या तुलनेत ४० टक्के बांबू लागवडीसाठी खर्च कमी येतो. मात्र तीन वर्षानंतर शाश्वत उत्पन्न आणि शेतकऱ्याला आर्थिक सुरक्षितता मिळते. बांबू पिका मध्ये जमिनीत पाणी साठवून ठेवण्याची क्षमता तसेच जमिनीची धूप थांबवण्याची क्षमता आहे. बांबूच्या कोंबापासून आणापर्यंत २६ मूल्यवर्धित उत्पादने महिलांना घरबसल्या स्वयंरोजगार देऊ शकतात. आपणही आपल्या शेतात एकरी दीडशे रुपये किंवा बांधावर पाच फुटावर एक बांबूचे बेट लागवड करू शकता. बांबूच्या लागवडीनंतर त्याला ड्रीप अथवा पारंपारिक पद्धतीने पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनीच पुढील अर्ज करावा.
यामुळे शाश्वत शेती विकास तर होईलच पण पर्यावरण संरक्षण, तापमान वाढीची तीव्रता कमी करणे, प्रदूषण विरहित वातावरणाची निर्मिती होणार आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांचे अर्थचक्रही बदलू शकते. चीनमध्ये ७० टक्के लाकडाला पर्याय म्हणून बांबूचा वापर केला जातोय, तो भारतामध्ये केवळ दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे. यातून बांबू शेतीला देशात किती संधी आहे हे कळून येते.
शेतीचे अवजारे तयार करणे, शेतीला, घराला कुंपण देणे, पिकांना आधार देण्यासाठी, गुरांचे गोठे, घर बांधकाम तर तंत्रज्ञानामुळे पेंडॉल, शामियाना, फर्निचर, खेळणीचे साहित्य, पेपर तयार करणे, हस्तकला, या बरोबरच विद्युत निर्मिती, इथेनॉलनिर्मिती, बायोगॅसनिर्मिती, बायोमास पॅलेट्स व ब्रिकेट्सनिर्मिती, जनावरांना चारा, लोणचे, न्यूट्रिशन टॉनिक, बांबू चहा असे वेगवेगळे उत्पादने घेतली जात आहेत. बांबू लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी पुढील लिंक द्वारे https://forms.gle/VT6B1h534wAm2xdU9 आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 9158715010 (पुनम कुलकर्णी)