इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जयपूरः करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी रोहित राठोड आणि नितीन फौजी या दोघांनाही अटक केली आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये आज बंद पाळला जात आहे.
पोलिसांनी रोहित राठोडला राजस्थानमधील एका गावातून अटक केली आहे, तर नितीन फौजीला हरियाणातील महेंद्र गढमधून अटक करण्यात आली आहे. हे दोघेही नवोदित गुन्हेगार असून सध्या ते राजस्थानमधील कुख्यात गुंड राकेश गोदारासाठी काम करत होते. गोदाराच्या सांगण्यावरून या दोन नराधमांनी ही घटना घडवली आहे. राजस्थान पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळीच या दोन बदमाशांची ओळख पटवली होती. रात्रभर सुरू असलेल्या शोध आणि कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान बुधवारी पहाटे दोन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात आली. आता दोन्ही बदमाशांच्या कडक बंदोबस्तात पोलिस जयपूरला पोहोचले आहेत.
सुखदेव सिंह गोगामेडी हे जयपूर येथील त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत असताना त्यांची तीन बदमाशांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेदरम्यान क्रॉस फायरिंगमध्ये नवीन शेखावत हा जागीच ठार झाला, तर नितीन फौजी आणि रोहित राठोड हे पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या फुटेजच्या आधारे राजस्थान पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे. यापूर्वी गुंड राकेश गोदाराने फेसबुक पोस्टद्वारे या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. गोगामेडी हा त्याच्या मार्गात अडथळा ठरत होता, म्हणून त्याने त्याची हत्या केली, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. यासोबतच भविष्यात कोणी आपल्या मार्गात अडथळे निर्माण केले तर त्यांनाही अशाच प्रकाराला सामोरे जावे लागेल, असा इशाराही गोदाराने दिला होता.
गोदरा हा कुख्यात गुंड संपत नेहराचा शिष्य आहे आणि संपतनेच गोदाराला गोगामेडीची सुपारी दिली होती. संपत नेहरा याला लॉरेन्स विश्नोई यांच्याकडून ही सुपारी मिळाली.