जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गर्दीचे ठिकाण हे चोरांचे हातसफाईचे आवडते ठिकाण असल्याचे आतापर्यंत नेहमीच समोर आले आहे. या गर्दीतून चोरी करणारे चोर इतक्या हातसफाईने चोरी करतात की ते कळतही नाही. जळगावमध्ये तर कथावाचन कार्यक्रमात दुस-या राज्यातून २८ चोर आल्याची माहिती समोर आली आहे. अशाच गर्दीच्या ठिकाणी चोरी करणा-या चोरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या जालना येथील सभेच्या वेळी अनेकांना आपली हातसफाई दाखवली आहे. पण, ही चोरी थोडी थोडकी नसून ती तब्बल एक कोटीची आहे.
विशेष म्हणजे आता सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी पोलिस अधीक्षकांकडे या सर्व चोरीची तक्रार दिली असून चोरीची घटना सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओही पोलिसांना व्हिडीओ दिला आहे. त्यात चोरी करणारा आरोपी दिसत आहे. जरांगे यांच्या सभेपूर्वी जालन्यात रॅली काढण्यात आली होती. रॅली आणि सभेमध्ये मोठ्या प्रमाणावर दागिने आणि पाकिटमारीच्या घटना घडल्या. आता पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.
एक कोटीच्या चोरीचा अंदाज
रॅलीची सुरुवात झाल्याच्या घटनेअगोदरपासून शनी मंदिर, गांधीचमन, मस्तगड, शिवाजी पुतळा, भोकरदन नाकामार्गे पांजरपोळ या ठिकाणी किमान ४० ते ५० सोन्याच्या साखळ्या, पाकिटे, पर्स आणि जवळपास ८० ते ९० मोबाईलची चोरी झाली. गर्दीचा फायदा घेवून एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेच्या ऐवाजावर चोरांनी डल्ला मारला.