इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : चाकण येथील एका व्यावसायिकाचे अपहरण करून १ कोटींची खंडणी मागणे आरोपींना चांगलेच महागात पडले. या प्रकरणातील चार आरोपी खंडणीची रक्कम घेण्यासाठी आले आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यामुळे पैसे तर मिळाले नाहीच पण तुरुंगाची हवा खाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चाकण परिसरात राहणाऱ्या संजय धुलाप्पा कुरुंदवाडे हे व्यावसायिक आहेत. २१ सप्टेंबरला संजय धुलाप्पा कुरुंदवाडे हे आपल्या मोटर सायकलने घराकडे जात असताना, त्यांना काही आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलला रिक्षा आडवी लावून अडवले आणि त्यांचे अपहरण केले होते. अपहरण केल्यानंतर आरोपींनी संजय धुलाप्पा कुरुंदवाडे यांच्याकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. फिर्यादीने आरोपींना खंडणी देण्याचे मान्य केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला सोडले होते.
मात्र आरोपींपैकी एक इसम फिल्मी स्टाईलने खंडणीचे पैसे घेण्यासाठी आल्यानंतर चाकण पोलिसांनी या गुन्ह्यातील पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर दोन खंडणीखोर आरोपी अजूनही फरार आहेत. शुभम उर्फ सोन्या विनोद काकडे, आकाश विनायक भुरे, शुभम युवराज सरवदे ,अजय नंदू होले आणि नवनाथ शांताराम बच्चे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. तर या खंडणी गुन्ह्यातील दोन आरोपी अजूनही फरार आहेत.
अटक करण्यात आलेले कुख्यात गुन्हेगार
खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्यावर खून, मारामारी, जबरी चोरी, आणि अवैध शस्त्र बाळगणे असे गुन्हे चाकण, हडपसर, राजगड आणि भोसरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहेत.