इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राजस्थान जयपूरमध्ये श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेत अंगरक्षकावरही गोळ्या झाडण्यात आल्या आहे. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले.
सुखदेव सिंह गोगामेडी आपल्या निवासस्थानी असतांना हा हल्ला करण्यात आला. हे दोन हल्लेखोर स्कुटीवरुन आले होते. ते चौघे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम नगरच्या रस्त्यावर सुखदेव सिंह गोगामेड़ी मंगळवारी दुपारी १.४५ च्या सुमारास घराबाहेर उभे होते. त्याचवेळी आरोपींनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. गोगामेड़ी यांना लगेच नजीकच्या मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांचा मृत घोषित केले. मेट्रो मास हॉस्पिटल बाहेर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली आहे. लॉरेस विश्नोई गँगच्या संपत नेहराकडून सुखदेव सिंह यांना आधी धमकी मिळाली होती त्यानंतर हा हल्ला करण्यात आला.
‘पद्मावत’ चित्रपटाला केलेल्या विरोधातून चर्चेत
सुखदेव सिंह आधी राष्ट्रीय करणी सेनेमध्ये होते. पण मतभेद झाल्यानंतर त्यांनी स्वत:ची स्वतंत्र संघटना स्थापन केली. त्यांनी या संघटनेला श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना नाव दिले होते. सध्या तेच या संघटनेचे अध्यक्ष होते. संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटावरुन राजस्थानात विरोध प्रदर्शन झालं होतं. त्यावेळी सुखदेव सिंह यांची अनेक वक्तव्य व्हायरल झाली होती.