इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीड येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त आज गोपीनाथ गडावर लोकनेते मुंडे यांच्या समाधीचे दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजीत पवार यांनी घेतले. त्यानंतर परळीत ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाचे दर्शन घेतले. या दोन्ही कार्यक्रमात मंत्री धनजंय मुंडे व पंकजा मुंडे बरोबर होते. त्यांनी नंतर परळी शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम व मुख्य कार्यक्रमाला एकत्रीत हजेरी लावली. या सर्व कार्यक्रमानिमित्त मुंडे भाऊ बहिण एकत्र आल्याचे समाधान बीड जिल्ह्यात होते. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आल्यामुळे त्याचे समाधान भाजप कार्यकर्त्यांमध्ये होते.
दुपारीच बीड जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बरोबर माजी मंत्री पंकजा मुंडे एकाच हेलिकॅाप्टरने बीडमध्ये आल्या आहेत. बीडमध्ये पोहचल्यानंतर मंत्री धनजंय मुंडे यांनी या सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर गोपीनाथ गडावर हे सर्व जण गेले.
एकुणच शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुंडे बहिण भावातील संघर्ष कमी झाल्याचे चित्र एकीकडे दिसत होते. तर दुसरीकडे भाजपलाही पंकजा मुंडे या कार्यक्रमाला आल्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यात यश आल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे दोन्ही भाऊ -बहिण एकत्र आल्यामुळे पंकजा ताई खासदारकी लढवेल व धनजंय मुंडे आमदारकी लढवेल अशी चर्चा सुरु झाली. पण, धनजंय मुंडे यांनीच या प्रश्नाला उत्तर देतांना सर्व सस्पेन्स आता का संपवतात असे सांगून या विषयावर बोलणे टाळले…..