मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या अथक परिश्रमातून भावी पिढी घडत असते. मुलांना स्वप्न बघण्याचा, उंच भरारी घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या पंखांना बळ देण्याची जबाबदारी शासनाची आहे. करिअर मार्गदर्शन उपक्रमातून कोणत्याही शाळेने ५० विद्यार्थ्यांना एकत्र आणून एखादे कौशल्य आत्मसात करण्याचे ठरवले तर त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करणार असून, आज प्रायोगिक तत्त्वावर सुरु झालेला करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर राबविण्याचा मानस आहे, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबईमधील ३०० शाळा आणि महाविद्यालयांतील ६० हजार विद्यार्थ्यांना करियर संदर्भातील मार्गदर्शन देण्यात येणार आहे. मंत्री लोढा यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, शालेय शिक्षण विभाग, शिक्षण संचालनालय आणि मुंबई महानगरपालिका यांच्या सयुंक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात प्रायोगिक तत्वावर १५ शाळांमध्ये हा उपक्रम राबवला गेला.
यावेळी मंत्री लोढा म्हणाले की, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणले. त्यामध्ये कौशल्य विकासावर अधिक भर दिला आहे. मुलांना, पालकांना आणि महाविद्यालयांना वेळेत विद्यार्थ्यांचा कल वेळेत कळावा यासाठी हे मार्गदर्शन खूप महत्वाचे आहे. भारतात गुरूकूल पध्दतीची आर्दश शिक्षण पध्दती बंद करून इंग्रजानी कारकूनी शिक्षण पध्दती आणली. आज आपण कौशल्य विकास शिक्षणात आमूलाग्र बदल करत आहोत. आज राबविण्यात येणारा उपक्रम फक्त शासनाचा उपक्रम म्हणून पाहू नका. सर्वांचे यामध्ये योगदान मोलाचे आहे. परदेशी भाषा अवगत करण्यासाठी परदेशी भाषांचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे असेही ते म्हणाले.
यावेळी मंत्री लोढा म्हणाले की, जगभरातून कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. नुकतीच इस्त्राईलमधून ५ हजार कुशल मनुष्यबळाची मागणी आली आहे. इस्त्राईलमध्ये नोकरी मिळाल्यानंतर तिथे संपूर्ण राहण्याचा व इतर खर्च ते सरकार करणार असून हा खर्च वगळता भारतीय चलनाप्रमाणे दीड लाख रूपये पगाराची नोकरी मिळू शकते. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास शाळा सुरु करत आहोत. तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, किमान कौशल्य विकास योजना सुरू आहेत. ३५० गावांत कौशल्य विकास केंद्र सुरू करत आहोत. फक्त विद्यार्थ्यांकडून अपार कष्ट आणि शिकण्याची जिद्द या गोष्टींची आवश्यकता आहे, असेही मंत्री लोढा म्हणाले.
या कार्यक्रमात करियर मार्गदर्शक आनंद मापुस्कर आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या प्राचार्य मनीषा पवार यांच्या पथकाने करियर संदर्भात मार्गदर्शन केले. विविध अभ्यासक्रमांची माहिती असलेली करियर प्रदर्शनी विद्यार्थी आणि पालकांना पाहण्यासाठी उपलब्ध होती. विविध करियर क्षेत्र, विविध अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजना याबाबत अद्ययावत माहिती असलेले करियर प्लॅनर हे पुस्तक विद्यार्थी आणि पालकांना विनामूल्य देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबईचे उपआयुक्त दि.दे.पवार, व्यवसाय शिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील, करियर मार्गदर्शक आनंद मापुस्कर, दक्षिण मुंबईचे शिक्षण निरीक्षक देविदास महाजन, मुंबई ‘मनपा’चे शिक्षणाधिकारी राजू तडवी, ग्रोथ सेंटरच्या संचालक स्वाती साळुंखे, सुचित्रा सुर्वे तसेच मुंबई महानगरपालिका शाळातील दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे विद्यार्थी, पालक व शिक्षक यावेळी उपस्थित होते.
असा आहे कौशल्य मार्गदर्शन कार्यक्रम
मुंबई महानगर क्षेत्रातील खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये ३०० शाळा, महाविद्यालयांमधील ६० हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी करिअर मार्गदर्शनपर मेळावा पहिल्या टप्प्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालय आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये करिअर कसे निवडावे, करिअरच्या विविध वाटा, व्यक्तिमत्व विकास, कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने अभ्यास कसा करावा याबाबत विद्यार्थी व पालकांना तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी विविध अभ्यासक्रमांची माहिती असलेली करिअर प्रदर्शनी विद्यार्थी आणि पालकांना पाहण्यास उपलब्ध असेल. विविध करिअर क्षेत्रे, विविध अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती योजना याबाबत अद्यायावत माहिती असलेले करिअर प्लॅनर हे पुस्तक विद्यार्थी व पालकांना विनामूल्य देण्यात येईल.