नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजनेत महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम ३ मधील अनुसुची-१ चे अनुच्छेदानुसार विविध कलमांतंर्गत मुद्रांक शुल्क व दंड वसूलीबाबत सवलत लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 दोन टप्प्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग १ राजेंद्र गायकवाड यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ ही १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ अशा दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासोबतच १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० आणि १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत निष्पादित केलेले परंतु नोंदणीस दाखल केलेले किंवा न केलेले दस्तांबाबत देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये देखील सवलत देण्यात येईल, असे शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
अशी आहे योजनेतील मुद्रांक शुल्क व शुल्कावर लागू होणाऱ्या दंडामधील सवलत
(१ जानेवारी १०८० ते ३१ डिसेंबर २०००)
योजनेचा पहिला टप्पा : देय होणाऱ्या तथा वसुली पात्र रुपये एक लाख पर्यंत मुद्रांक शुल्क रकमेमध्ये १०० टक्के व प्रत्यक्षात देय होणाऱ्या तथा वसुली पात्र असल्यास संपूर्ण मुद्रांक शुल्कावर लागू होणाऱ्या दंडामध्ये १०० टक्के सूट देण्यात येईल. देय होणाऱ्या तथा वसुली पात्र रुपये एक लाख एक व त्यापेक्षा अधिक मुद्रांक शुल्कामध्ये ५० टक्के व प्रत्यक्षात देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्कावर लागू होणाऱ्या दंडामध्ये १०० टक्के सूट देण्यात येईल.
योजनेचा दुसरा टप्पा :
देय होणाऱ्या तथा वसुली पात्र रुपये एक लाख पर्यंत मुद्रांक शुल्क रकमेमध्ये ८० टक्के व प्रत्यक्षात देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्कावर लागू होणाऱ्या दंडामध्ये ८० टक्के सूट देण्यात येईल. देय होणाऱ्या तथा वसुली पात्र रुपये एक लाख एक व त्यापेक्षा अधिक मुद्रांक शुल्कामध्ये ४० टक्के व प्रत्यक्षात देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्कावर लागू होणाऱ्या दंडामध्ये ७० टक्के सूट देण्यात येईल.
१ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत निष्पादित नोंदणीबाबत :
योजनेचा पहिला टप्पा
देय होणाऱ्या तथा वसुली पात्र रुपये २५ कोटी पर्यंत मुद्रांक शुल्क रकमेमध्ये २५ टक्के व प्रत्यक्षात देय होणाऱ्या दंडाची रक्कम ही रुपये २५ लाखांपेक्षा कमी असल्यास देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्कावर लागू होणाऱ्या दंडामध्ये ९० टक्के सूट देण्यात येईल. तसेच दंडाची रक्कम रुपये २५ लाखांपेक्षा जास्त असल्यास केवळ रुपये २५ लाख रक्कम दंड म्हणून स्विकारण्यात येऊन उर्वरित दंडाच्या रक्कमेची सूट देण्यात येईल.देय होणाऱ्या तथा वसुली पात्र रुपये २५ कोटी पेक्षा अधिक मुद्रांक शुल्क रक्कमेमध्ये २० टक्के व रुपये एक कोटी रक्कम दंड म्हणून स्विकारण्यात येऊन उर्वरित रकमेची सुट देण्यात येईल.
योजनेचा दुसऱ्या टप्पा :
देय होणाऱ्या तथा वसुली पात्र रुपये २५ कोटी पर्यंत मुद्रांक शुल्क रकमेमध्ये २० टक्के व प्रत्यक्षात देय होणाऱ्या दंडाची रक्कम ही रुपये ५० लाखांपेक्षा कमी असल्यास देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्कावर लागू होणाऱ्या दंडामध्ये ८० टक्के सूट देण्यात येईल. तसेच दंडाची रक्कम रुपये ५० लाखांपेक्षा जास्त असल्यास केवळ रुपये ५० लाख रक्कम दंड म्हणून स्विकारण्यात येऊन उर्वरित दंडाच्या रक्कमेची सूट देण्यात येईल. देय होणाऱ्या तथा वसुली पात्र रुपये २५ कोटी पेक्षा अधिक मुद्रांक शुल्क रकमेमध्ये १० टक्के व रुपये दोन कोटी रक्कम दंड म्हणून स्विकारण्यात येऊन उर्वरित रकमेची सुट देण्यात येईल. यायोजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही श्री. गायकवाड यांनी केले आहे.