अकोले (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत अहमदनगर जिल्हयातील कळस बु जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आठ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलाच अनोखा प्रयोग होत असल्याने शिक्षिका संगीता दिघे यांचे कौतुक होत आहे.
बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे २०२३ /२४ या शैक्षणिक वर्षासाठी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परीक्षेत आराध्या संदीप वाकचौरे, कावेरी राजेंद्र खताळ, श्रेया माधव कोल्हाळ, संनती संदीप ढगे, आदिती किसन मेंगाळ, तनुजा रमेश ढगे, आरुष अंकुश वाकचौरे, दर्शन संतोष कातोरे हे विध्यार्थी चांगले गुणांनी उत्तीर्ण झाले. दहा विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले असता आठ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
या स्पर्धेमागचा हेतू आहे विज्ञानावर आणि पर्यावरणावर प्रेम करणारा समाज घडवण्याचा. या स्पर्धेच्या निमित्ताने विज्ञानाची पुस्तके मुले वाचतात. विज्ञानाच्या संकल्पना समजून घेतात. का ? कसे? हे प्रश्न वारंवार विचारतात. त्याचे उत्तर शोधण्यासाठी प्रयोग करतात. जसे ज्ञान मिळवतात तशी विज्ञानाची गोडी ही वाढते पर्यावरणाचे महत्त्व पटते. सहाजिकच मुले विज्ञाननिष्ठ व पर्यावरण प्रेमी होतात. याच हेतूने ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा इयत्ता सहावी व नववी साठी असते.
त्यांना वर्गशिक्षिका संगीता ठकाजी दिघे, मुख्याध्यापक काशिनाथ आंधळे, सहशिक्षक अनाजी मुठे, सबाजी दातीर, स्वप्ना गुरव, सुवर्णा जाधव, माधवी गोरे, पुष्पा सूर्यवंशी, वृषाली बर्वे आदींचे मार्गदर्शन लाभले.या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समिती चे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ, जेष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, सोसायटी चेअरमन विनय वाकचौरे, जयकिसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू वाकचौरे, सदस्य नामदेव निसाळ यांनी अभिनंदन केले आहे.