नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक आणि क्रीडा उपसंचालक नाशिक विभाग यांच्या वतीने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलच्या मैदानावर सुरू असलेल्या एक १७ वर्षे गटाच्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलीच्या संघानी आपल्या गटातील दूसरा सामना जिंकून बाद फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या २८ संघांची आठ गटात विभागणी करण्यात आली होती. पहिले तीन दिवस या आठ गटामध्ये गटवर साखळी सामने खेळविले गेले. या गटवर साखळी सामन्यातील निकालानंतर प्रत्येक गटातून पहिले दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत.
“अ” गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात ओरिसा संघाला १ गडी आणि सात मिनिटे राखून १३-१२ असा पराभव करून आपल्या गटातून पहिल्या क्रमांकाने बाद फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला. या सामन्यात प्रथम सांरक्षण करतांना महाराष्ट्राच्या संघाने केवळ पाच गडी गमावले तर आक्रमणामध्ये ओरिसचे १० गडी बाद करून पहिल्या सत्रात १०-०५ अशी पाच गुणांची आघाडी मिळविली. तर दुसऱ्या सत्रात आक्रमणामध्ये ओरिसा संघाने महाराष्ट्राच्या सात खेळाडूंना बाद करण्यात ओरिसा संघाने यश मिळविले. तर आपल्या आक्रमणामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पहिल्या मिनिटातच आक्रमक पवित्रा घेत ओरिसाच्या तीन खेळाडूंना बाद केल्यामुळे महाराष्ट्राने तब्बल सात मिनिटे राखून हा सामना जिंकून बाद फेरीत प्रवेश केला. या विजयात महाराष्ट्राकडून शंकर यादवने पुनः सुंदर खेळाचे प्रदर्शन करून पहिल्या सत्रात दोन मिनिटे पळून चांगले संरक्षण केले तर दुसऱ्या सत्रातही तीन मिनिटे दहा सेकंद पळतीचा खेळ करून आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी केली. तर विलास वळवीनेपहिल्या सत्रात १मिनिट ४० सेकंद आणि दुसऱ्या सत्रात एक मिनिट पळतीचा खेळ करून चांगले संरक्षण केले. तर कृष्णा बनसोडनेही १ मिनिट २० सेकंद आणि नाबाद ५० सेकंद संरक्षण केले.
आक्रमणामध्ये तन्मय शेवाळेने चार गडी बाद करून आपल्या विजयात महत्वाची भूमिका पार पडली. केला मुलीच्या गटात “क” गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जम्मू-काश्मीर संघावर ३० विरुद्ध ०५ अश्या २५ गुणांनी मात करून आपला दुसरा विजय मिळवत गटातून पहिल्या क्रमांकाने बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात कर्णधार सुषमा चौधरीने आक्रमणामध्ये पाच गडी टिपले. तर राजेश्वरी आमणेने तीन मिनिटे पळतीचा खेळ करून दोन गडी बाद केले. तर अमृता पाटील ( तीन मिनिटे धावणे आणि २ गडी बाद), प्राजक्ता बनसोड (१ मिनिट आणि ३ गडी बाद), धनश्री तामखेडेने ( २.४० मिनिते आणि ४ गडी बाद) या सर्वानीच आपल्या विजयामध्ये महत्वाचा वाटा उचलला.
अन्य सामन्यांमध्ये मुलीच्या गटात तामिळनाडूने उत्तर प्रदेशचा सहा गुणांनी पराभव केला, तर कर्नाटकने सी.आय.एस.सी.इ. वर ७ गुणांनी विजय मिळविला. तर पंजाबने ओरिसाला एक डाव आणि चार गुणांनी पराभूत केले. मुलांच्या गटात उत्तर प्रदेशने सी.बी.एस.सी. संघावर एक डाव २ गुणांनी मात केली तर गुजराथने मध्य प्रदेशवर एक डाव आणि ५ गुणांनी विजय मिळविला, हरीयाणाने कर्नाटकवर ९ गुणांनी विजय मिळविला. उद्या सकाळपासून बाद फेरीच्या सामन्यांना सुरवात होणार आहे.
स्पर्धांच्या नियोजनबद्ध आयोजनासाठी स्कूल गेम्स ऑफ इंडियाचे निरिक्षक के. एस.मूर्ती आणि कु. कनक चतुर्धर तर तांत्रिक समिती प्रमुख शरद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात येत आहे. तर क्रीडांगणाची जबाबदारी मंदार देशमुख, उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते यशस्वीरीत्या पार पडत आहे. स्पर्धेच्या उत्कृष्ठ आयोजमनासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी तथा क्रीडा समितीचे अध्यक्ष जलज शर्मा, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सानंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टीळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, संजय ढाकणे, महेश पाटील आणि त्यांचे सहकार परिश्रम घेत आहेत.
बाद फेरीमध्ये दाखल झालेले संघ :
मुले – महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजराथ, केंद्रीय विद्यालय संघटन, हरयाणा, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, पॉंडेचरी, मणिपूर, राजस्थान.
मुली – महाराष्ट्र , केरळ , कर्नाटक, पंजाब, गुजराथ, छत्तीसगड, हरियाणा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, राजस्थान, बिहार, ओरिसा, तेलंगणा, मणिपूर.