बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बीड जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बरोबर माजी मंत्री पंकजा मुंडे सुध्दा एकाच हेलिकॅाप्टरने बीडमध्ये आल्या आहेत. त्यामुळे पंकाज मुंडे यांची काहीशी नाराजी दूर करण्यात भाजपला यश आल्याचे बोलले जात आहे.
बीडमध्ये पोहचल्यानंतर मंत्री धनजंय मुंडे यांनी या सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर गोपीनाथ गडावर हे सर्व जण गेले. एकुणच शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुंडे बहिण भावातील संघर्ष कमी झाल्याचे चित्र एकीकडे दिसत होते. तर दुसरीकडे भाजपलाही मुंडे या कार्यक्रमाला आल्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यात यश आल्याचे बोलले जात आहे.
या कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळी आणण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेसचे नियोजन करण्यात आले असले तरी काही ठिकाणी मराठा आरक्षण करणा-या आंदोलकांनी त्याला विरोध केल्याच्याही काही घटना समोर आल्या. या कार्यक्रम स्थळी व पार्कींगच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था, डॉक्टरांच्या टीम व रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लाभार्थ्यांच्या जेवणाची व कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी याबाबत देखील नियोजन करण्यात आले आहे.