इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : सोशल मीडियामुळे कधी कुणाचे एखादे वक्तव्य व्हायरल वा ट्रोल होऊन जाईल सांगता येत नाही. असाच प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत घडला आहे. त्यांच्या एका ट्वीटमुळे ते चांगलेच ट्रोल झाले असून सध्या सोशल मीडियावर त्याची खमंग चर्चा आहे.
राज्यात सुरू असलेल्या विविध विभागांच्या पदभरतीसाठी तरुणांकडून अधिकचे शुल्क आकारून लूट मांडल्याचा आरोप होत आहे. शासनाकडे या माध्यमातून कोट्यवधींचे शुल्क जमा होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा शुल्काचा विषय ऐरणीवर आला असून एका उमेदवाराने पात्र ठरणाऱ्या तीन ते पाच संवर्गासाठी अर्ज करण्याचा विचार केल्यास त्याला तब्बल पाच हजार रुपयांचे परीक्षा शुल्क भरावे लागले.
यामुळे शुल्कासाठी वाढता विरोध बघून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एका विभागाच्या विविध पदांच्या परीक्षेसाठी एकच शुल्क आकारले जावे अशा सूचना दिल्या होत्या. यामुळे एकापेक्षा अधिक अर्ज भरताना शुल्काचा भार कमी होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, चार महिन्यानंतरही यावर कुठलीही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ट्विट करून अजित पवार यांना ट्रोल केले आहे.
विद्यार्थ्यांकडून वसुलीचा आरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शब्दांसाठी पक्के मानले जात होते, पण तिकडे गेल्यापासून त्यांचे शब्द खोटे वाटायला लागले आहेत. नोकरभरती मधील परीक्षा शुल्क कमी करण्याची मागणी झाली तेव्हा, अजित पवारांनी ट्विट केले होते. पण या निर्णयाची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालीच नाही, सरकार विद्यार्थ्यांकडून शुल्कापोटी करोडो रुपये वसूल करतच आहे असा आरोप केला आहे.