इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवे वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाचा दक्षिणेकडील राज्यांना फटका बसला आहे. चेन्नईत वादळ आणि मुसळधार पावसामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच ७० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत तर २०४ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे. आज आंध्र प्रदेशात मिचॉन्ग धडकणार आहे. ५ डिसेंबरच्या दुपारच्या दरम्यान नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडून त्याचे रूपांतर तीव्र चक्री वादळात होईल. तेव्हा ९०-१०० किमी प्रतितास ते ११० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. महाराष्ट्रातही पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशमध्ये ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे सखल भागात लोकांना मदत केंद्रात हलवण्याला सुरुवात झाली आहे. एसएमएस आणि हवामान बुलेटिनद्वारे स्थानिक भाषांमध्ये इशारा जारी केला जात आहे. मच्छिमार आणि समुद्रातील जहाजे परत आली आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यात आला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी, देखरेख करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने रात्रंदिवस पुरेशा प्रमाणात अधिकारी तैनात केले आहेत.
आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडच्या अनेक भागांत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे पूर्वेकडील वाऱ्यांनी पश्चिमेकडून येणाऱ्या थंड हवेचा मार्ग अडवला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत कमाल तापमानात ४.२ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच थंडी जाणवू लागेल. चक्रीवादळ मिचॉन्गच्या प्रभावामुळे दोन दिवसांनंतर रिमझिम पाऊस होऊ शकतो. उत्तर प्रदेशातील २० जिल्ह्यांमध्ये आज पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. नव्या सायक्लॉन सर्क्युलेशनमुळे, लखनऊ, बुंदेलखंडमधील २० जिल्ह्यांमध्ये सात डिसेंबरपर्यंत रिमझिम पाऊस पडेल. दहा डिसेंबरपर्यंत खोऱ्यातील हवामान कोरडे होईल,
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे पुढील २४ तासांत महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होईल. मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, लातूर भागात अवकाळी पाऊस होईल.
मदत पथकांना सज्ज
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये २१ तुकड्या तैनात केल्या आहेत आणि ८ अतिरिक्त तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जहाजे आणि विमानांसह तटरक्षक दल, लष्कर आणि नौदलाच्या बचाव आणि मदत पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे.
सर्व प्रतिबंधात्मक आणि सावधगिरीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत यावर गौबा यांनी भर दिला. जीवितहानी टाळून मालमत्तेचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहे.बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि भारतीय तटरक्षक दलाही सच्च आहे.