नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. पंतप्रधानांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली.महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रधानमंत्री म्हणाले की, मालवण, तारकर्ली किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग हा भव्य किल्ला, वीर शिवाजी महाराजांचे वैभव आणि राजकोट किल्ल्यावरील त्यांच्या नेत्रदीपक पुतळ्याचे लोकार्पण आणि भारतीय नौदलाचा जयघोष आणि ४ डिसेंबर या ऐतिहासिक दिवसामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचे मन उत्कटता आणि उत्साहाने भारावून गेले आहे.मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांपुढे नतमस्तक झाले.
नौदल दिनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण,
भारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये राजमुद्रेचा वापर
हे तमाम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ही बाब आपल्या सर्वांच्या गौरवाची आहे. भारतीय नौदलाच्या ध्वजामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रेचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले व तमाम महाराष्ट्रासाठी गौरवाची अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. शिवपराक्रमाने पावन झालेल्या शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.
आज संपूर्ण महाराष्ट्रच नाहीतर राष्ट्र शिवाजी महाराजांना अभिवादन करत आहे. या ऐतिहासिक पूर्वसंध्येला त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. यावेळी महाराष्ट्राची पहिली नौदल अधिकारी म्हणून श्रीमती देवस्थळी यांची नेमणूक झाली आहे याचाही तमाम महाराष्ट्राला अभिमान असल्याचे सांगून ते म्हणाले देशातील महिलांच्या आत्मनिर्भरतेच प्रतीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालं आहे. आत्मनिर्भरतेचा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा आणि वसा आपण सर्वजण पुढे घेऊन जात आहे. आत्मनिर्भर भारत आणि आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास आलाय. आता आपल्या सामर्थ्याची नोंद संपूर्ण जगाने घेतलेली आहे.