नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सिंधुदुर्ग येथे आयोजित ‘नौदल दिन २०२३’ च्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची ‘थरारक प्रात्यक्षिके ’ यांचे त्यांनी निरीक्षण केले. मोदी यांनीगार्ड ऑफ ऑनर सोहळ्याची पाहणी केली. याकार्यक्रमात त्यांनी आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावं देणार असल्याची घोषणाही केली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, मालवण, तारकर्ली किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग हा भव्य किल्ला, वीर शिवाजी महाराजांचे वैभव आणि राजकोट किल्ल्यावरील त्यांच्या नेत्रदीपक पुतळ्याचे लोकार्पण आणि भारतीय नौदलाचा जयघोष आणि ४ डिसेंबर या ऐतिहासिक दिवसामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचे मन उत्कटता आणि उत्साहाने भारावून गेले आहे.मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांपुढे नतमस्तक झाले.
सिंधुदुर्गच्या विजयी भूमीवर नौदल दिन साजरा करणे हा खरोखरच अभूतपूर्व अभिमानाचा क्षण आहे असे पंतप्रधान म्हणाले. “सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो” असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा उल्लेख करत सांगितले की कोणत्याही देशासाठी नौदल क्षमतेचे महत्त्व ते जाणून होते. ज्यांचे समुद्रावर नियंत्रण आहे त्यांच्याकडे अंतिम सत्ता आहे या शिवाजी महाराजांच्या घोषणेचा पुनरुच्चार करत पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी शक्तिशाली नौदलाची उभारणी केली. कान्होजी आंग्रे, मायाजी नाईक भाटकर, हिरोजी इंदुलकर या योद्ध्यांपुढे नतमस्तक होत ते आजही प्रेरणास्थान असल्याचे पंतप्रधानानी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने प्रेरित होऊन आजचा भारत गुलामगिरीची मानसिकता झुगारून पुढे मार्गक्रमण करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. नौदल अधिकार्यांच्या गणवेशावरील मानचिन्ह (इपॉलेट्स) आता छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि ठेवा अधोरेखित करतील कारण हे नवीन मानचिन्ह नौदलाच्या प्रतीक चिन्हाशी साधर्म्य साधते याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी गेल्या वर्षी नौदलाच्या ध्वजाचे अनावरण केल्याची आठवण सांगितली. आपल्या वारशाचा अभिमान बाळगत पंतप्रधानांनी घोषणा केली की भारतीय नौदल आता भारतीय परंपरेनुसार आपल्या पदांचे (रँक) नामकरण करणार आहे. सशस्त्र दलांमध्ये नारी शक्ती मजबूत करण्यावरही त्यांनी भर दिला. नौदलाच्या जहाजात भारताच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरच्या नियुक्तीबद्दल मोदी यांनी भारतीय नौदलाचे अभिनंदन केले.