नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीस धमकी देत विनयभंग करणा-या आरोपीस तीन महिन्यांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दुर्गेश दिलीप गवळी (३२ रा.काकड चाळ,विठाई हॉस्पिटल समोर मखमलाबाद नाका) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना २०२० मध्ये दिंडोरीरोड वरील वज्रेश्वरीनगर भागात घडली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वज्रेश्वरीनगर भागात राहणा-या १२ वर्षीय पीडीतेच्या आईने तक्रार दाखल केली होती. पीडिता ६ ऑगष्ट २०२० रोजी आपल्या घरात एकटी असतांना सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती.
५०० रुपये देतो सांगत विनयभंग
आरोपीने पीडितेच्या घरात प्रवेश करून आतून दरवाजाची कडी लावून घेत तुला ५०० रुपये देतो असे बोलून तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्याच परिसरात राहणा-या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत आरोपीने तिला कुणास सांगितले तर तुझ्या घरच्यांना पाहून घेईल अशी धमकी दिली होती.
या कोर्टात चालला खटला
याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ चे कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास उपनिरीक्षक अश्विनी उबाळे यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयास सादर केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्र.१ च्या न्या.मृदुला भाटीया यांच्या कोर्टात चालला.
सरकार पक्षातर्फे यांनी बघितले काम
सरकार तर्फे अॅड. रेश्मा जाधव यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपी गवळी यास विनयभंग आणि पोस्को कायद्यान्वये दोषी ठरवत त्यास तीन महिन्यांचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपए दंडाची शिक्षा सुनावली.