जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील वडनगरी फाटा येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी आपत्तीच्या दृष्टीने सतर्कता बाळगत दक्षता घ्यावी.यासाठी कार्यक्रमाच्या आपत्ती व्यवस्थापन व कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित यंत्रणांनी एकमेकांना सहकार्य करावे. अशा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.
वडनगरी फाटा येथे ५ ते ११ डिसेंबरदरम्यान बडे जटाधारी महादेव मंदिर समितीच्या वतीने पंडित प्रदीप मिश्रा यांचा सात दिवसीय श्री शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची पूर्व तयारी, आपत्ती व्यवस्थापन तसेच कायदा- सुव्यवस्था दृष्टीने संबंधित शासकीय विभागांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक एम राजकुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, उपजिल्हाधिकारी अर्चना काळे, महावितरण अधीक्षक अभियंता अनिल महाजन, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, नगरपालिका प्रशासन सहायक आयुक्त जनार्दन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जळगाव तहसीलदार विजय बनसोडे विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच मंदीर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे, साईड पट्ट्या बुजवावेत. कार्यक्रम व्यासपीठाची तपासणी करावी. आरोग्य विभागाने खासगी व शासकीय रूग्णालयातील दहा टक्के बेड आरक्षित ठेवावेत. कार्यक्रमस्थळांवर २० बेडचे रूग्णालय उभारण्यात यावे. पुरेसे फिरते स्वच्छतागृह उभारण्यात यावीत. पुरेशा रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात याव्यात.
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीनंतर प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळावर जात पूर्व तयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमासाठी एक दिवस अगोदर उपस्थित असलेल्या भाविकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पोलीस विभागाने वाहतूक नियोजन काटेकोरपणे करावे. एसटी महामंडळाने दररोजच्या १०० बसेसचे नियोजन करावे. महावितरण विभागाने कार्यक्रमस्थळावरील व परिसरातील विद्युत व्यवस्था तपासून घ्यावी. बीएसएनएलने इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी. अन्न व औषध प्रशासनाने भाविकांना दिल्या जाणाऱ्या जेवण व पाण्याची तपासणी करावी. महानगरपालिकेने ४ अग्नीशमन वाहने कार्यक्रमस्थळावर सुसज्ज ठेवावीत. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, कार्यक्रमस्थळावरील आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने घ्यावयाच्या सर्व दक्षतांची परिपूर्तता करावी. जिल्ह्यातील १२०० पोलिसांची कुमक कार्याक्रमाच्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी सज्ज करण्यात आली आहे. असे पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले.