नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक आणि क्रीडा उपसंचालक नाशिक विभाग यांच्या वतीने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलच्या मैदानावर ६७ वी राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलीच्या संघानी आपल्या गटातील सामने जिंकून आपले विजयी अभियान सुरु केले.
या सर्व संघांची आठ गटात विभागणी करण्यात आली आहे. पहिले दोन दिवस या आठ गटामध्ये गटवर साखळी सामने खेळविले जात आहेत. या गटवर साखळी सामन्यातील निकालानंतर प्रत्येक गटातून पहिले दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
“अ” गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने आपल्या पहिल्या साखळी सामन्यात पंजाबचा १२ विरुद्ध ०५ अश्या १ डाव आणि ७ गुणांनी विजय मिळवून चांगली सुरवात केली. या सामन्यात महाराष्ट्राकडून शंकर यादव याने २.५० मिनिटे पळतीचा खेळ करून आपले चांगले संरक्षण केले तर आक्रमणामध्ये दोन गडी टिपले. राजू पाटीलनेही २ मिनिटे संरक्षण(बचाव) करतांना दोन गडी बाद केले, तर कृष्णा बनसोडने नाबाद ०.५० सेकंड बचाव करून आक्रमणामध्ये दोन गडी बाद केले. मुलीच्या विभागामध्ये “क” गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने बिहार संघावर ३३-०२ असा तब्बल ३१ गुणांनी पराभव करून विजयी सुरवात केली. या सामन्यात महाराष्ट्राची कर्णधार सुषमा चौधरी हीने संरक्षणात तीन मिनिटे आपला बचाव केला तर आक्रमणामध्ये तीन गडी बाद केले. अमृता पाटीलने तब्बल सात गडी टिपून मोलाची कामगिरी केली तर प्राजक्ता बनसोड हीने तीन गडी बाद केले. मोनिका ताते हीने सुंदर अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करून ४ मिनिटे आपला बचाव करून तब्बल सहा गडी बाद केले, त्याचबरोबर मोनिका संपत हीने आक्रमणामध्ये पाच गडी टिपले.
आज झालेल्या गटवार साखळी सामन्यांमध्ये मुलांच्या गटात तेलंगाना,केरळ, राजस्थान, विद्या भारती, झारखंड, पॉंडेचरी, मणिपूर दिल्ली यांनी आपल्या गटातील साखळी सामन्यात विजय प्राप्त केले. मुलींमध्ये छतीसगड, तेलंगणा,मणिपूर, विद्या भारती, गुजराथ, नवोदय विद्यालय, हरियाणा, पश्चिम बंगाल या संघांनी आपल्या गटातील सामने जिंकून पुढे आगेकूच केली आहे.