इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली -ललित कला आणि संस्कृतीच्या त्यांच्या प्राविण्य प्राप्त क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या परंतु वृद्धत्वामुळे आता आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ कलाकारांसाठी सांस्कृतिक मंत्रालय “ज्येष्ठ कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य योजना” या नावाने एक योजना राबवते. या योजनेचा नुकताच आढावा घेण्यात आला आणि जून, २०२२ पासून मासिक आर्थिक सहाय्य ४ हजारवरून ६ हजार करण्यात आले आहे. ईशान्य प्रदेशाचे सांस्कृतिक, पर्यटन आणि विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.
सध्याच्या योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संबंधित लाभार्थी कोणत्याही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित असला तरीही निवडलेल्या कलाकारांना रुपये ६ हजार रुपये प्रति महिना आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ११२३३ कलाकारांची निवड करण्यात आली आहे.
केरळ राज्यासह सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील निवडक लाभार्थ्यांना त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे मिळाल्यावर त्यांना आर्थिक सहाय्य वेळेवर वितरित व्हावे यासाठी सरकारचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. योजनेंतर्गत आर्थिक सहाय्याचे वितरण मात्र लाभार्थींनी काही अनिवार्य कागदपत्रे सादर करण्यावर अवलंबून असते. लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर, आर्थिक सहाय्य त्वरित वितरित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातात. लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदतीचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी, मंत्रालय आणि कॅनरा बँक यांच्यात २८ जून २०२३ रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.