मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून निधी मंजूर
येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील चिचोंडी येथे औद्योगिक वसाहत विकसित करण्यात आली आहे. या औद्योगिक वसाहतीत मुख्य रस्त्यापासून वाहतुकीसाठी अंगणगाव ते चिचोंडी औद्योगिक वसाहत या बायपास रस्त्याच्या कामासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी एकूण ३२ कोटी ४ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
येवला मतदारसंघातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला चिचोंडी येथे औद्योगिक वसाहत विकसित करण्यात आली आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्था, अंतर्गत रस्ते यासह आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या असून याठिकाणी काही लघु उद्योग देखील सुरु झाले आहे. या ठिकाणी अधिकाधिक उद्योग वाढावे व त्यासाठी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून अंगणगाव ते चिचोंडी औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या स्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.
चिचोंडी औद्योगिक वसाहतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यामुळे येथील उद्योजकांना आपल्या मालाची वाहतूक करण्यासाठी दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहे. परिणामी औद्योगिक वसाहतीतील उद्योग वाढीस चालना मिळून चिचोंडी औद्योगिक वसाहतीचा अधिक विकास होणार आहे. तसेच तालुक्यातील नागरिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.
चिचोंडी औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी प्रचलित दरात २५ टक्के सवलत देण्यात यावी. जेनेकरून याठिकाणी मोठे उद्योजक आकृष्ट होऊन येथील उद्योगाला अधिक चालना मिळेल यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू आहे.