नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चार्जिंगला लावलेल्या मोबाईल मुळे घरात स्फोट होऊन कुटुंबातील तीन जण जखमी झाल्याची घटना पाच दिवसापूर्वी उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजता घडली होती. पण, हा स्फोट मोबाईलमुळे नाही तर गॅस लिकेज झाल्याने झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. या स्फोटामुळे मोठी आग भडकून घरातील साहित्य जळून खाक झाले होते. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती. घरात झालेल्या स्फोटामुळे घराबाहेरील गाड्यांच्या व आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या. त्यामुळे परिसरात काहीशी घबराट पसरली होती.
या स्फोटात तीन जण जखमी झाले होते. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा स्फोट मोबाइल चार्जिग करतांना झाला असावा असा असा प्राथमिक अंदाज होता. ही घटना घडल्यानंतर अंबड पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर त्यानी तपास सुरु केला. आज या स्फोटामागील कारण समोर आले आहे.
घरातील महिलेने गॅसवर पाणी गरम करण्यासाठी गॅस शेगडीचे बटन सुरु केले. त्यानंतर लायटरने गॅस पेटवण्याचा प्रयत्न केला. पण, लायटर बंद पडल्याने त्यांनी काडेपेटीचा बॉक्स शोधला. यात बराच वेळा गेल्याने गॅसची मोठ्या प्रमाणावर गळती झाली होती. त्यानंतर काडेपेटी पेटवताच ही आग भडकली.