नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंदिरा नगरमधील रथचक्र चौकात अल्पदरातील पावभाजीसाठी ग्राहकांनी अक्षरशा गोंधळ घातल्याने दुकानदारा विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात वाहतूकीस अडथळा ठरल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या दुकानदाराने उदघाटनाबाबत सोशल मीडियावर जाहिरात केली होती. त्यामुळे ही गर्दी उलटली होती. त्यामुळे त्याची ही आयडिया अंगलट आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलींद बाबुराव कुलकर्णी (रा.मोदकेश्वर मंदिराजवळ,इंदिरानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पावभाजी दुकानदाराचे नाव आहे. कुलकर्णी यांनी रथचक्र चौकात हॉटेल पावभाजी पांडा नावाचे दुकान सुरू केले. या दुकानाच्या उदघाटना निमित्त सोशल मिडीयावर अल्पदरात पावभाजीची जाहिरात केल्याने रविवारी (दि.३) येथे तोबा गर्दी जमली.
ग्राहकांनी वाहनांसह पावभाजीसाठी धाव घेतल्याने या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. नागरीकांनी नंबर लावण्यासाठी भेटेल त्या जागी वाहने पार्क करून रांगा लावल्याने रस्त्याने येणा-या जाणा-या वाहतूकीसह पादचा-यांनाही मनस्ताप सहन करावा लागला. खरं तर ही आयाडिया वेगळी असली तरी इतका प्रतिसाद मिळेल हे दुकानदाराला लक्षात आले नाही. एकाच वेळी गर्दी काही झाल्यामुळे काही वेळ अडचण झाली. नंतर मात्र गर्दी सुरळीत झाली.