इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रातील सत्ताधारी भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत निर्भेळ यश मिळवले आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप या राज्यांतील ८२ पैकी बहुतांश जागा आपल्या खिशात सहजपणे टाकेल असा दावा केला जात आहे. हिंदी भाषक भागात काँग्रेसकडे केवळ हिमाचल प्रदेश हे एकमेव राज्य उरले आहे. तर दक्षिणते काँग्रेसने तेलंगणा जिंकून आणखी एक राज्यात सत्ता मिळवली आहे. याअगोदर काँग्रेसने कर्नाटकमध्ये यश मिळवले होते. दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिलनाडु आणि तेलंगाना या राज्यांचा समावेश आहे. या पाचही राज्यात मात्र भाजपची सत्ता नाही.
उत्तर भारतात आतापर्यंत राजस्थान, छत्तीसगड व हिमाचल प्रदेश या तीन राज्यांत काँग्रेसचे सरकार होते; पण या निवडणुकीत या तीनपैकी दोन राज्यांत काँग्रेसला पराभवाची चव चाखावी लागली आहे. यामुळे हिमाचल वगळता संपूर्ण हिंद्दी पट्टा काँग्रेसमुक्त झाल्याचे चित्र आहे. याचा परिणाम आगामी सार्वत्रिक निवडणुकांत होऊन त्याचा लाभ भाजपला होण्याची शक्यता आहे.
देशात झालेल्या पाचही विधानसभेच्या निवडणूका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर लढवण्यात आल्या. मोदींचा उत्तर भारतावर जबरदस्त पगडा आहे. त्यामुळे साहजिकच जनतेने त्यांच्यामागे उभे राहणे पसंत केल्याचे चित्र आहे. हाच कल लोकसभा निवडणुकीतही कायम राहील असा दावा राजकीय तज्ञांचा आहे.