इंडिया दर्पण वृत्तसेवा
नंदुरबार – ज्या गावांमध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी ‘ठक्कर बाप्पा’ योजनेचा लाभ मिळत नव्हता. या योजनेचा संपूर्ण आदिवासी बहुल क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी योजनेची व्याप्ती आता राज्य व जिल्हा अशा दोन्ही स्तरांवर वाढविण्यात आली असून जिल्ह्यातील संपूर्ण ९४३ गावातील वाड्यावस्त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भातील अध्यादेशही शासनाने जारी केला आहे, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
ते ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत नंदुरबार तालुक्यातील १३ गावांमधील विविध विकासकामांच्या भूमीपूजन व उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, संरपंच, अधिकारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, या योजनेची व्याप्ती वाढल्याने जिल्ह्यातील ९४३ गाव व वाड्या वस्त्यांतील लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील ९४३ गाव-पाड्यांपैकी काही मर्यादित गावांनाच ठक्कर बाप्पा योजनेचा लाभ मिळत होता. ठक्कर बाप्पा योजनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आदिवासी वस्तींचा विकास होऊ शकत नसल्याने हा त्यांच्यावर अन्याय असल्याची भावना लाभार्थ्यांची होती. त्यामुळे ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा करत त्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना सामाजिक न्याय विभागाच्या “अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती सुधारणा योजना, पूर्वीची “दलित वस्ती सुधार योजना” व “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना” या योजनांप्रमाणे राज्यस्तर व जिल्हास्तर अशा दोन्ही स्तरांवर राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत कामांची यादी, योजनेची व्याप्ती व कामांचे लोकसंख्यानिहाय आर्थिक निकष सुधारित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक गाव-वस्तीत कामांची संख्या वाढेल व आदिवासी जनतेला त्याचा लाभ मिळेल व त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. संबंधित लोकप्रतिनिधींची मागणी व कामाचे स्वरूप आणि प्रचलित कायदे, नियम लक्षात घेऊन या योजनेंतर्गत करावयाच्या कामांना प्रचलित नियमानुसार ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पालिका, नगरपंचायत, महापालिकेकडून तांत्रिक मान्यता देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यावर भर दिला जाईल. वस्तीत पाणीपुरवठा आणि स्वच्छता सुविधा उभारण्याचे काम शासनाने यापूर्वीच सुरू केले आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात वस्तीमधील शैक्षणिक आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर दिला जाईल. आदिवासी समुदायांना शिक्षण आणि आरोग्य सेवा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्यासाठी शाळा आणि आरोग्य सेवा केंद्रे स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे. योजनेचा तिसऱ्या टप्प्यात आदिवासी समुदायांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे आदिवासी वस्तीतील जीवनमानाच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगाराच्या संधी त्यामुळे वस्तीमध्ये राहणाऱ्या आदिवासी समुदायांसाठी निर्माण होणार आहेत.
ठक्कर बाप्पा योजनेतून समाजमंदिर, सामाजिक सभागृह बांधणे, मंगल कार्यालय, स्मशानभूमी, स्मशानभूमी जोड रस्ता, बस थांबा, प्रवासी निवारा, शेड बांधकाम, सार्वजनिक शौचालय, मुतारी बांधकाम, रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवणे,व्यायामशाळा, वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका बांधकाम करणे, नदीकाठची संरक्षण भिंत, गावामध्ये सौरऊर्जा, विद्युत उर्जेवर आधारित पोल, डीपी बसविणे, पर्यटन विकासाची कामे, माता बाल संगोपन केंद्र बांधकाम, गावांमध्ये कचरा डेपोसाठी, प्राथमिक प्रगतीसाठी सुविधा निर्माण करणे, गावांतर्गत जोडणारे रस्ते, बंद गटार बांधणे, नाल्यासह मोऱ्या बांधकाम, शासकीय आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळांना मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते तयार करणे, फिल्टर प्लांट, कूपनलिका, हातपंप बसविणे, सबमर्सिबल पंप बसविणे, अशी विविध कामे आता घेता येणार आहेत. योजनेसाठी आदिवासी वस्ती वाडे, पाडे व समूहांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात कामांसाठी वित्तीय मर्यादा विहित केली आहे. यात तीन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी १ कोटी, १५०० ते ३००० लोकसंख्येसाठी ७५ लाख, १००० ते १४९९ लोकसंख्येपर्यंत ५० लाख, ५०० ते ९९९ लोकसंख्येपर्यंत ४० लाख, १०१ ते ४९९ लोकसंख्येपर्यंत २० लाख, १ ते १०० लोकसंख्येपर्यंत ५ लाख, असा विकास निधी दिला जाणार असल्याचेही पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. तसेच पालकंत्र्यांसोबत स्वच्छतेच्या सामुहिक श्रमदानातही सहभाग नोंदवला.
या गावांना झाले विकास कामांची भूमीपूजन
नंदुरबार तालुक्यातील भालेर,नगाव, शिंदगव्हाण, काकर्दे, जुनमोहिदा, हाटमोहिदा, बोराळा, सुजालपूर, कोरीट, खोंडामळी, वितरण, नाशिंदे या गावांमधील ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत विविध विकास कामांचे भूमीपूजन पालकमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.