इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आंतरराष्ट्रीय सागरी संघटना(आयएमओ) परिषदेच्या सभेमध्ये झालेल्या निवडणुकीत २०२४-२५ या दोन वर्षांसाठी भारताची या संघटनेवर सर्वाधिक मतांनी फेरनिवड झाली आहे. या फेरनिवडीमुळे ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, स्पेन, स्वीडन आणि संयुक्त अरब अमिरात(यूएई) या देशांसोबत “आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारामध्ये सर्वाधिक रुची ” असलेल्या दहा देशांच्या श्रेणीत भारताचा समावेश झाला आहे.
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेत भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाने दिलेल्या पाठबळामुळे आम्ही आनंदित आहोत आणि त्याबद्दल कृतज्ञ आहोत. सर्वाधिक मते म्हणजे आंतरराष्ट्रीय सागरी व्यवहारांमध्ये भारताच्या विविध प्रकारच्या योगदानाला बळकटी देण्याच्या सरकारच्या निर्धाराचे निदर्शक आहे. जागतिक सागरी क्षेत्रामध्ये भारताची सेवा पुढे सुरू राहावी म्हणून आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाकडून भारताला मोठ्या प्रमाणावर पाठबळ उपलब्ध झाले. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना सागरी उद्योगाचे नियमन, जागतिक व्यापार, परिवहन आणि सर्व सागरी व्यवहारांना पाठबळ देणारी आघाडीची संघटना आहे. एमआयव्ही २०३० अंतर्गत प्रतिनिधीत्व वाढवण्यासाठी आयएमओ इंडियाचे, आयएमओ लंडन येथे स्थायी प्रतिनिधी नियुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. भारतासाठी सागरी नैपुण्यामध्ये वाढ करण्यासाठी आणि त्यांचा वापर करण्यासाठी भारताने आयएमओमध्ये दोन कनिष्ठ व्यावसायिक अधिकारी या पदासाठी किमान दोन पात्र उमेदवार नामांकित केले पाहिजे असे प्रस्तावित केले आहे.
अमृत काळ व्हिजन २०४७ ने भारताच्या जागतिक सागरी उपस्थितीला बळकट करण्याचे देखील लक्ष्य निर्धारित केले आहे. अमृत काळ व्हिजन २०४७ कृती योजनेचा भाग म्हणून ४३ उपक्रम निर्धारित केले आहेत ज्यापैकी प्रमुख उपक्रमांचा आपल्या जागतिक सागरी उपस्थितीला बळकट करण्यावर भर आहे ज्यामध्ये भारतामध्ये समर्पित आयएमओ कक्ष,आयएमओ लंडन मुख्यालयात स्थायी प्रतिनिधीची नियुक्ती, प्रादेशिक प्रकल्पांची समन्वयित आणि कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक भक्कम बिम्सटेक संस्थात्मक संरचना निर्माण करणाऱ्या बिम्सटेक बृहद आराखड्याची निर्मिती इ.चा समावेश आहे.