सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर सार्वजनिक वाचनालयात सामाजिक कार्यकर्ते व निर्भय बनो अभियानाचे डॅा. विश्वभंर चौधरी यांचे रविवारी व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानात भाजपा, रा.स्व. संघाचे आणि बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी गोधळ घातला. यावेळी त्यांनी चौधरी यांचे भाषण बंद केले. माईक हिसकावून घेतला व व्यासपीठाची मोडतोड केली. या घटनेची माहिती चौधरी यांनीच एक पोस्ट टाकत दिली.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,मी सुखरूप आहे. काळजी करू नका. आज सिन्नरला व्याख्यान सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच स्थानिक भाजपा अध्यक्ष, रा.स्व. संघाचे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते विनाकारण आक्रमक झाले आणि भाषण बंद करा, रामनवमीला डीजे का वाजवायचा नाही असे प्रश्न ओरडून विचारायला लागले. यापैकी कोणालाही मी ओळखत नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ते भाजप, रा.स्व. संघ आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते होते.
मजल इतकी गेली की भाजपाच्या स्थानिक अध्यक्षानं माझ्यासमोरचा माईक अक्षरशः उपटून फेकून दिला. काही कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर मोडतोड केली आणि एका कार्यकर्त्यानं धक्काबुक्की केली. मी व्याख्यान रद्द करण्याचा निर्णय घेतला कारण सिन्नर मधली कायदा आणि सुव्यवस्था मला बिघडवायची नव्हती. एक जबाबदार नागरिक म्हणून तेच माझं कर्तव्य आहे. अन्यथा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्तेही आक्रमक झाले असते.अशा हल्ल्यांनी आम्ही घाबरणार नाही याची नोंद संबंधितांनी घ्यावी. आम्ही निर्भय आहोत, निर्भय राहू. राज्याचे गृहमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी फोनवर बोलून त्यांना या झुंडगिरीची माहिती दिली आहे. खरंतर ही घटना लिहावी इतकीही मोठी नाही पण व्हाट्सअपवरून कळाल्यामुळे अनेकांचे फोन येत आहेत म्हणून खुशाली कळवत आहे.