इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्तीसगडमध्ये ९० जागेपैकी भाजपने ५४ जागेवर आघाडी घेत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. या राज्यात काँग्रेसला ३३ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. छत्तीसगडमधील बहुतांश राजकीय पंडितांचे भाकीत चुकीचे ठरताना दिसले. काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात पुनरागमन करणार असेच बोलले जात होते. पण, भाजपने मोठा धक्का दिला.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सरकारच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी होती. बघेल यांच्या योजना चांगल्या होत्या; पण त्यांची अंमलबजावणी नीट झाली नाही. टीएस सिंह देव यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात विलंब झाला. काँग्रेस पक्षाला उशिरा जाग आली. भाजपने आपल्या पक्षात बदल केले. छत्तीसगडमध्ये निवडणुकीचे वातावरण असताना महादेव बेटिंग अॅपच्या मुद्द्यामुळे राज्यातील राजकीय तापमान वाढले होते. महादेव बेटिंग अॅपची ही बाब गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. या प्रकरणामुळे बॉलीवूड स्टार्स पहिल्यांदाच चर्चेत आले. त्यानंतर या प्रकरणात बघेल यांचेही नाव पुढे आले. महादेव बेटिंग अॅप प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे नाव समोर आल्याने भाजपनेही काँग्रेसवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही.
मोदी यांनी छत्तीसगडमधील रॅलींमध्ये महादेव बेटिंग अॅपचा उल्लेख करून बघेल यांच्यावरही हल्ला चढवला. महादेव बेटिंग अॅप प्रकरणामुळे निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी काँग्रेसचे नुकसान झाले. छत्तीसगडमध्ये अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) छापेही सातत्याने सुरू होते. ‘ईडी’च्या छाप्यामुळे राज्यात प्रचंड भ्रष्टाचाराचे वातावरण असल्याचा संदेश जनतेत गेला. काँग्रेस सरकारच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये बघेल सरकारची प्रतिमा डागाळली आणि काँग्रेसचे नुकसान झाले. याशिवाय या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाला अंतर्गत कलहही कारणीभूत होता. छत्तीसगडमधील कथित दारू घोटाळ्याच्या आरोपांमुळे राज्य सरकारची प्रतिमाही डागाळली आणि या निवडणुकीत नुकसान झाले. बघेल हे खूपच आत्मविश्वासू दिसत होते. राज्यात काँग्रेसचा विजय झाल्याचा दावा ते सातत्याने करत होते. बघेल यांच्या या अतिआत्मविश्वासाने छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारलाही हानी पोहोचवली.