इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हैदराबादः तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तेलंगणाची स्थापना झाल्यानंतरची ही तिसरी निवडणूक आहे. या निवडणुकीत केसीआर मुख्यमंत्री म्हणून हॅट्ट्रिक करण्यात अपयशी ठरले आहे. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. तेलंगणात केसीआर यांच्या ४० तर काँग्रेसला ६४ जागा मिळताना दिसत आहेत.
याठिकाणी काँग्रेसकडून रेवंत रेड्डी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.राज्यातील विधानसभा निवडणूकीत रेवंत रेड्डी हे प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. रेवंत रेड्डी काँग्रेसचे खासदार आहे. आता त्यांचा प्रवास खासदार ते मुख्यमंत्री असा होण्याची शक्यता आहे. ५४ वर्षीय रेड्डी काँग्रेसची मोठी ताकद आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर ते टीडीएफमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन आपले स्थान भक्कम केले आहे.
केसीआर यांचे सर्व मनसुबे धुळीस
तेलंगणामध्ये केसीआर यांच्या पराभवामागे त्यांचा राष्ट्रीय राजकारणाकडे असलेला कल असल्याचे मानले जाते. २०२४ च्या निवडणुकीपूर्वीही ते याच फॉर्म्युल्याखाली विरोधी आघाडी भारतामध्ये सामील झाले नाहीत. ऑक्टोबर २०२२ मध्ये, केसीआर यांनी त्यांच्या पक्षाचे नाव बदलून बीआरएस केले. तेलंगणाच्या निवडणुकीला वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राज्यात केसीआरच्या विरोधात वातावरण निर्माण झाले. त्यामुळे केसीआर यांचे सर्व मनसुबे धुळीस मिळाले आहेत. एकीकडे त्यांचे गृहराज्य तेलंगणातील सत्ता गेली, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना सोबत घेण्याचे त्यांचे प्रयत्नही यशस्वी होताना दिसत नाहीत.