इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जयपूरः चार राज्याच्या निवडणुकाचे निकाल जवळपास स्पष्ट झाल्यानंतर राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. भाजपने १९९ जागापैकी ११४ जागेवर आघाडी येथे घेतली आहे. त्यामुळे बहुमतांच्या आकड्यापेक्षा या जास्त जागा आहे. त्यामुळे भाजपचे सरकार आता या राज्यात स्थापन होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधीया, जयपुर राजघराण्यातील दीया कुमारी, खासदार बालकनाथ, व राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांचे नावे चर्चेत आहेत.
आता राजस्थानमध्ये स्थानिक बडया नेत्याला मुख्यमंत्री केले जाते, की दिल्लीतून मुख्यमंत्री पाठवला जातो, हे आता पक्षश्रेष्ठी ठरवणार आहेत. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतर होण्याची परंपरा कायम राहिली आहे. राजस्थानमध्ये २०० पैकी १९९ जागांसाठी मतदान झाले. बहुमतासाठी १०० जागा आवश्यक आहेत. या जादुई आकृतीबंधात काँग्रेस खूप मागे पडली असून गेहलोत यांची जादू पूर्णपणे फसली आहे त्यांच्या पारडयात ७१ जागाच अद्यापर्यंत आल्या आहे.
मोदी यांचीच जादू चालली
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचा कोणताही चेहरा नव्हता. या ठिकाणी मोदी यांचीच जादू चालली. निवडणुकीत भाजपने पंतप्रधान मोदींचा चेहरा समोर केला आहे. पंतप्रधानांनी स्वतः १५ सभा घेतल्या. बिकानेर आणि जयपूरमध्ये रोड शोही केले. प्रचारादरम्यान पंतप्रधानांनी गेहलोत सरकारवर भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाचे आरोप करत त्यांना घेरले. भाजपचे हिंदुत्वाचे कार्ड पुन्हा खेळले. दोनशे जागा असलेल्या राजस्थानमध्ये भाजपने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नाही. २०१८ च्या निवडणुकीत भाजपने टोंकमधून सचिन पायलट यांच्या विरोधात युनूस खान यांना उमेदवारी दिली होती; मात्र या वेळी त्यांचे तिकीट रद्द करण्यात आले. मुस्लिमबहुल तीन जागांवर भाजपनेही संतांना उमेदवारी दिली.
कन्हैयालाल हत्या प्रकरणाचे भांडवल
कन्हैयालाल हत्या प्रकरणाचे भांडवल भाजपने केले राजस्थान निवडणुकीत भाजपनेही कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा मुद्दा जोरात मांडला होता. ही सबब वापरून भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसवर तुष्टीकरणाचा आरोप करून कोंडी करण्याचा प्रयत्न केला. जून २०२२ मध्ये झालेल्या हत्याकांडाच्या निमित्ताने भाजपने येथे पुन्हा जातीय कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. स्वत: मोदी यांनी त्यांच्या एका रॅलीत कन्हैयालालच्या हत्येचा उल्लेख केला होता गृहमंत्री अमित शाहा यांनी स्वतः कन्हैया हत्याकांडाचा उल्लेख त्यांच्या सभांमध्ये अनेकदा केला.
पेपरफुटी व लाल डायरीचा मुद्दा
पेपरफुटीचा मुद्दा बनवून भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडले. पेपरफुटीचा मुद्दाही राजस्थान सरकारच्या गळ्यातला काटा ठरला. या प्रकरणी सचिन पायलट यांनीही निवडणुकीपूर्वी आपल्याच सरकारला कोंडीत पकडले होते आणि राजस्थानमधील भरती परीक्षांच्या पेपरफुटीच्या चौकशीची मागणी केली होती. राज्यातील लाखो बेरोजगार त्रस्त आहेत. भाजपने निवडणुकीत हा मुद्दा बराच उचलून धरला आणि सरकारला गोत्यात आणले. भाजपने या निवडणुकीत लाल डायरीलाही मोठा मुद्दा बनवला. काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना खुद्द पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवडणूक सभांमध्ये लाल डायरीचा उल्लेख केला होता.