इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः वायू प्रदूषण ही जगासाठी एक गंभीर समस्या बनली आहे. ‘द बीएमजे’ (द ब्रिटीश मेडिकल जर्नल) ने केलेल्या नुकत्याच झालेल्या संशोधनात भारतात दरवर्षी २० लाख लोक हवेच्या प्रदूषणामुळे मरतात, असे नमूद केले आहे.
जगभरात दरवर्षी ५.१ दशलक्ष म्हणजेच ५१ लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू होतो. त्यात चीन पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. संशोधनात, वायू प्रदूषणाची मुख्य कारणे उद्योग, वीजनिर्मिती आणि वाहतुकीमध्ये जीवाश्म इंधनाचा वापर अशी आहेत. २०१९ मधील सर्व स्त्रोतांमधून बाहेरील वायू प्रदूषणामुळे जगभरातील एकूण अंदाजे ८.३ दशलक्ष मृत्यूंपैकी ६१ टक्के मृत्यू हे जीवाश्म इंधनाच्या जागी स्वच्छ, नूतनीकरणक्षम ऊर्जेने टाळता येऊ शकते, असे संशोधकांनी सांगितले.
या संशोधनाचे परिणाम असे दर्शवतात, की २०१९ मध्ये जगभरात ८३ लाख मृत्यू हवेतील पार्टिक्युलेट मॅटर (पीएम२.५) आणि ओझोन (ओ३) मुळे झाले आहेत. त्यापैकी ६१ टक्के मृत्यू हे जीवाश्म इंधनामुळे झाले आहेत. वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंची ही कमाल टक्केवारी आहे. वायू प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये झाले आहेत. चीनवर दरवर्षी २४.५० लाख लोक मरतात. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात वीस लाख मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतात. त्यापैकी ३० टक्के हृदयविकाराने, १६ टक्के पक्षाघाताने, १६ टक्के फुफ्फुसाच्या आजाराने आणि ६ टक्के लोकांचा मृत्यू मधुमेहामुळे झाला आहे.
जगातील हे शहर आहे सर्वाधिक प्रदूषित
दिल्ली हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे अनेक वेळा एक्यूआय ९९९ वर पोहोचतो. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये पाकिस्तानचे लाहोर दुसऱ्या क्रमांकावर आणि भारतातील कोलकाता तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई चौथ्या स्थानावर आहे.