दीपक ओढेकर
हॅंगझाऊ या चीन मधील शहरात १९ व्या आशियाई स्पर्धा सुरु होऊन एक आठवडा झाला पण नाशिकच्या मृण्मयी साळगावकर (रोइंग), विदित गुजराथी (वैयक्तिक बुद्धिब ) आणि सिध्दार्थ परदेशी (थ्री मी सिंक्रोनाइज्ड डायविंग) यांना अंतिम फेरीत पोहोचूनही पदकाने अखेर हुलकावणी दिलीच, त्यामुळे नाशिकची पाटी अजून कोरीच आहे.
मृण्मयी coxless 4 मध्ये पाचवी तर coxed 8 मध्ये सहावी आली. विदित गुजराथीचे अपयश अधिक धक्कादायक आहे. कारण नक्की पदक जिंकणार असे वाटत असताना नऊ स्पर्धकांत महत्वाच्या अशा अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या विदितपेक्षा बरेच कमी रेटिंग असलेल्या जविखिर सिंदारोवकडून तो पराभूत होऊन पाचव्या स्थानी आल्याने त्याचे पदक हुकले. सिध्दार्थ परदेशी आणि हेमन लंडन सिंग ही जोडी तीन मी सिंक्रोनाइज्ड डायविंग मध्ये अंतिम फेरीत सहा स्पर्धकांमध्ये अवघे २७६ गुण मिळवून सहावी आली. तर चीनच्या जोडीने तब्बल ४७५ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले.
अशा रितीने नाशिक करांसाठी आशियाई खेळामधील पहिला आठवडा काही खूप चांगला गेला नाही. पण, दुसरा आठवडा मात्र नाशिकच्या स्पर्धकांसाठी आशादायक आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण ज्या खेळात निश्चित पदक मिळणार आहे असे दोन सांघिक खेळ आजपासून सुरु होत आहेत/ झाले आहेत ते म्हणजे कबड्डी आणि बुद्धिबळ.
चेस ऑलिंपियाड विजेता भारतीय बुद्धिबळ संघ कर्णधार विदित सह प्रद्न्यानानंद, गुकेश, अर्जुन एरिगैसी आणि अनुभवी हरिकृष्ण अशा जगात पहिल्या तीस खेळाडू असलेल्या अतिशय तगड्या संघासह मैदानात उतरला आहे आणि पहिल्या चार लढती जिंकून भारतीय संघाने सुरुवातही दणक्यात केली आहे. त्यामुळे बुद्धिबळात पदकाची आशा किंवा खात्री नक्कीच आहे.
कबड्डीत नऊ वेळचा सुवर्णपदक विजेता भारत पुरुष संघ मागील स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. यावेळी देखील पहिल्या तीन मध्ये भारत निश्चित असेल अर्थात अपेक्षा सुवर्णपदकाचीच आहे. या संघात नाशिकच्या आडगाव येथील ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबचा आक्रमण स्पेशालिस्ट आकाश शिंदे हा भारतीय आक्रमणाचे प्रमुख अस्त्र असणार आहे. ही गोष्ट नाशिकच्या कबड्डी प्रेमीना सुखावह वाटेल आणि पदक जिंकून आणले तर दुधात साखर पडेल. महिला कबड्डीत मागील २०१८ च्या जाकार्ता स्पर्धेत इराणच्या विजेत्या संघाच्या प्रशिक्षक होत्या नाशिकच्या
शैलजा जैन याही वेळी प्रशिक्षणाची धुरा त्यांच्याच कडे देण्यात आली आहे. त्यामुळे इराणने सुवर्णपदक पुन्हा जिंकावे अशी तयारी जैन यांनी करुन घेतली आहे.पण अगदी सुवर्णपदक नाहीतरी रौप्य वा कांस्यपदक इराणचा महिला संघ नक्की जिंकून जाईल अशी खात्री जैन यांना आहे. त्यामुळे कबड्डीत दुसऱ्या पदकातही नाशिकचा वाटा असणार आहे.
नाशिकला अजून एका पदकाची आशा आहे ती उंच उडी या खेळात. देवगावच्या रावसाहेब जाधव यांच्यकडे उंच उडीचे प्राथमिक धडे घेतलेल्या सर्वेश कुशारे याने कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावर खूपच उंच उडी मारून प्रगती केली आहे. दोन महिन्यापूर्वी त्याने आशियाई विजेतेपद स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते ते २:२५ मी उडी मारून. आता त्याला येत्या चार तारखेला असाच पराक्रम करुन आपले आणि भारताचे नाव उज्वल करण्याची संधी चालून आली आहे. आज सकाळीच तो अंतिम स्पर्धेत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली २:१० मी उडी आरामात मारून पात्रता फेरी पार केली आणि त्याने रुबाबात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या शिवाय सिध्दार्थ परदेशी १० मी हायबोर्ड आणि ३ मी platform या डायविंग मधील स्पर्धेत आपले कसब येत्या ४ आणि ५ ता ला अजमावून पाहणार आहे. एकंदरीत नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला आनंद देणारा आणि नाशिकचा मान उंचाविणारा हा सप्ताह असणार आहे.