नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकार आणि सर्व पक्षाच्या सभागृह नेत्यांची बैठक झाली. ४ डिसेंबरपासून हे अधिवेशन सुरू होईल, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. या अधिवेशनचा समारोप २२ डिसेंबरला शुक्रवारी होईल. त्यात १९ दिवसांत कामकाजाच्या १५ बैठका होतील, अशी माहिती त्यांनी दिली. त्यात भारतीय नाट्य संहिता, मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती, कार्यकाल), केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (दुसरी सुधारणा) या तीन विधेयकांसह एकूण २१ विधेयके आणली जाणार असून त्यातील दोन वित्त विधेयक आहेत.
संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांनी कार्यपद्धतीच्या नियमांतर्गत परवानगी दिलेल्या कोणत्याही मुद्द्यावर सभागृहात चर्चा करण्यास सरकार नेहमीच तयार असते, असे जोशी यांनी सांगितले. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी सहकार्य करावे आणि पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मांडलेले मुद्दे ऐकून घेतल्यानंतर बैठकीत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी उपस्थित नेत्यांचे आभार मानले आणि या सर्व मुद्द्यांवर संसदेच्या संबंधित सभागृहांच्या नियमांनुसार आणि संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांच्या परवानगीने चर्चेसाठी सरकार तयार असल्याचे सांगितले. या बैठकीला तेवीस राजकीय पक्षांचे एकूण तीस नेते उपस्थित होते.