इगतुपरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी शहरातील कुख्यात डेव्हीड गँगचा म्होरक्या कवूभाई याचेवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे. शहरातील सर्वसामान्य नागरीक तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील स्टॉलधारक, व्यावसायिकांमध्ये डेव्हीड गॅगच्या कुख्यात गुन्हेगारांच्या धाक दडपशाहीमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झालेले होते. यातील गुन्हेगारांवर इगतपुरी पोलीस ठाण्यासह, इगतपुरी रेल्वे, कल्याण रेल्वे, नाशिक शहर आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी लुटमार, चोरी, गंभीर दुखापत, भारतीय हत्यार कायदा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
वरील गुन्हयांची पार्श्वभूमी पाहता इगतपुरी शहरातील कुख्यात डेव्हीड गैंगवे सदस्य नागे १) सायमन पॅट्रीक मॅनवेल उर्फ छोटा पापा, २) अजय पॅट्रीक मॅनवेल उर्फ आज्या, दोघे रा. गायकवाड नगर, इगतपुरी, तसेच ३) अजय उर्फ टकल्या राजु पवार, रा. बजरंगवाडी, इगतपुरी, ता. इगतपुरी यांचेविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) १९९९ चे कलम ३ (१), (११), ३(२), ३ (४) अन्वये कारवाई करण्यात आली होती.
सदर डेव्हीड गॅगमधील आरोपी कवूभाई उर्फ फान्सीस पॅट्रीक मॅनवेल, रा. गायकवाड नगर, इगतपुरी हा टोळीचा म्होरक्या असून त्याने त्यावे वरील साथीदारांसह खून, खूनाचा प्रयत्न, जबरी लुटमार, आर्म अॅक्ट, खंडणी वसुली यासारखे अनेक गंभीर गुन्हे केलेले आहेत. सदर टोळीची इगतपुरी शहरात दहशत असून त्याने अनेक लोकांना मारहाण करून दहशत माजविली असल्याने जीवाचे भीतीपोटी त्यांचेविरूध्द कोणीही तकार देण्यास धजावत नाहीत. यातील आरोपी कवूभाई उर्फ फ्रान्सीस पॅट्रीक मॅनवेल हा स्वतः तसेच त्याचे डेव्हीड गँगचे सदस्यांमार्फत नेहमी तक्रारदार, फिर्यादी यांचेवर दबाव आणून त्यांना तकार देण्यापासून धाकाने परावृत्त करून शासकिय अधिकारी व कर्मचारी यांचेवरही दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यास उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून तो इगतपुरी शहर व परिसरातील व्यापारी, श्रीमंत व्यक्ती यांना धमक्या देवून खंडण्या गोळा करत असतो. इगतपुरी पोलीस ठाणे येथील सन २०२२ मधील खूनाच्या गुन्हयात आरोपी कवूभाई उर्फ फान्सीस पॅट्रीक मॅनवेल हा जामीनावर असतांना त्याने अलीकडील कालावधीत इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील एका व्यापा-यास, त्याचे साथीदारांसह कट रचून, जीवे मारण्याची धमकी देवून खंडणीचा गुन्हा केलेला आहे. यावरून आरोपी कवूभाई उर्फ फान्सीस पॅट्रीक मॅनवेल याची डेव्हीड गैंग अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आले असून, त्याचे साथीदार हे डेव्हीड गैंग या संघटीत गुन्हेगारी टोळीच्या नावाने सततचे गुन्हे करीत आहे. सदरचे कृत्य बेकायदेशीर असल्याचे माहित असूनही आरोपी कवूभाई हा जाणीवपूर्वक त्यात सततचा सहभाग घेत आहे.
वरील नमूद प्रकारच्या बेकायदेशीर कारवाया या महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) १९९९ कायद्याच्या अंतर्गत येत असून आरोपी कवूभाई उर्फ फान्सीस पॅट्रीक मॅनवेल रा. गायकवाड नगर, इगतपुरी हा त्याच्या बेकायदेशीर कारवाया सतत करत आहे व वारंवार गंभीर व संघटीत गुन्हेगारी स्वरूपाचे अपराध करण्याचे कट रचतो म्हणून त्याचेविरूध्द इगतपुरी पोलीस ठाणेस येथे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) १९९९ चे कलम ३ (१) (1), ३ (२), ३ (४) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. इगतपुरी शहरातील डेव्हीड गँगच्या वरील कुख्यात सदस्यांवर नाशिक ग्रामीण पोलीसांनी कारवाई केल्याने इगतपुरी शहर, कसारा, कल्याण, नाशिक शहर या ठिकाणांवरील, तसेच रेल्वेस्टेशन परिसरातील गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल भामरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि सोपान राखोंडे तसेच पोहवा इम्रान खान, पोकॉ प्रकाश कासार, स्थागुशाचे पोहवा हेमंत गरूड यांनी वरील कुख्यात गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.