नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– देशाचे भविष्य ज्यांच्या हाती आहे, त्या नवीन पिढीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे ही शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी आहे. त्यासाठी शिक्षणाचे उद्दिष्ट मुळापासून समजून घ्यावे लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
दि साऊथ पब्लिक स्कुलच्या वतीने चिटणवीस सेंटर येथे आयोजित इंटरनॅशनल प्रिन्सिपल्स एज्युकेशन कॉन्फरन्सच्या समारोपीय सोहळ्यात ना. नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला परिषदेचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संपादक विजय फणशीकर, परिषदेच्या संयोजक डॉ. मृणालिनी दस्तुरे, दि साऊथ पब्लिक स्कुलचे संचालक देवेंद्र दस्तुरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘ज्ञान ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पदवी घेतल्यानंतर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखादी व्यक्ती विद्वान होऊ शकते, मात्र एक चांगला माणूस म्हणून समाजात स्थान निर्माण करेलच, याची खात्री देता येणार नाही.
त्यासाठी शिक्षण घेताना आणि शिक्षण देताना शिक्षणाचे मुळ उद्दिष्ट समजून घेणे आवश्यक आहे. इथिक्स, इकॉनॉमी आणि इकॉलॉजी या तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. या ठिकाणी उपस्थित झालेल्या प्राचार्यांनी व शिक्षकांनी शिक्षणाचे ध्येय समजून घेत नवीन पिढीला संस्कारित केले तर उद्याची चांगली पिढी त्यांच्या हातून घडेल.’ शिक्षणातील यश आणि जीवनातील यश यामध्ये खूप अंतर आहे. आपल्या मार्गदर्शनात तयार होणारा विद्यार्थी संवेदनशील आहे का, त्याला सामाजिक जबाबदारी कळते का, याचाही विचार शिक्षकांनी करण्याची गरज आहे, असेही ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले. यावेळी विविध शाळांच्या प्राचार्यांना उत्कृष्ट योगदानासाठी ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.