इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चित्रपटसृष्टीतील कन्नड अभिनेता नागभूषणच्या कारने बंगळूरूमध्ये फुटपाथवरून चालणाऱ्या जोडप्याला शनिवारी रात्री धडक दिली. या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला असून, तिच्या पतीची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. या अपघातानंतर पोलिसांनी अभिनेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नागभूषणने स्वत: जखमी दाम्पत्याला रुग्णालयात नेले
बंगळुरूमधील वसंतपुरा मेन रोडवर रात्रीच्या सुमारास अभिनेता नागभूषणच्या कारने शहरात फुटपाथवरून चालणाऱ्या जोडप्याला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात झाल्यानंतर पोलिसांनी नागभूषणवर गुन्हा दाखल केला आहे. प्रेमा एस (४८) आणि कृष्णा बी ( ५८) हे दोघे फूटपाथवरून जात असतानाच उत्तरहल्लीहून कोनानकुंटे चौकाच्या दिशेने कार चालवत असलेल्या अभिनेता नागभूषणच्या कारने त्यांना धडक दिली. त्यानंतर नागभूषणची कार ही विजेच्या खांबाला धडकली.
महिलेचा मृत्यू
अपघातामध्ये एस प्रेमा या महिलेचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तसेच तिच्या पतीच्या दोन्ही पायांना, डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर नागभूषण स्वत: जखमी दाम्पत्याला रुग्णालयात घेऊन गेला होता. ही घटना शहरातील ट्रॅफिक पोलीस हद्दीत घडल्यामुळे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नागभूषणला अटक केली. यामुळे आता त्याच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.
वासराला कार धडकू नये म्हणून अपघात
अल्कोमीटर चाचणीत त्याने मद्य प्यायले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नागभूषणच्या दाव्यानुसार रस्त्यात भटक्या वासराला कार धडकू नये, म्हणून त्यानं कट मारला होता. त्यामुळे हा अपघात झाला.
अनेक चित्रपटात काम
नागभूषणने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘संकष्ट करा गणपती’ या चित्रपटामधून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते, त्याचा ‘तगारू पल्या’ हा बहुचर्चित चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र आता या घटनेची कन्नड चित्रपट सृष्टीत चर्चा होत असून या अभिनेत्याच्या कारकीर्दीला गालबोट लागले आहे.