नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -मालेगाव मंडळात असलेल्या मेशी / दहिवड येथील महावितरणच्या विद्युत उपकेंद्राला नाशिक परिमंडलात दुसरे आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी येथील अभियंते, यंत्रचालक व सहकाऱ्यांनी संघटितपणे अथक परिश्रम घेतले आहे. नाशिक नंतर मालेगाव मंडळात सुध्दा या खडकाळ भागात अत्यंत कष्ट घेवून ग्राहकांना अखंडीत सेवा देण्यासाठी उपकेंद्रामध्ये केलेले भरीव कार्य कौतुकास्पद असून, स्वच्छ, उत्कृष्टता आणि परिपूर्ण असलेली ही विद्युत उपकेंद्रे इतरांना दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले.
ते महावितरणच्या मालेगाव मंडळातील देवळा उपविभागाअंतर्गत असणाऱ्या ३३ / ११ के.व्ही. मेशी / दहिवड विद्युत उपकेंद्राला मुंगसरा उपकेंद्रानंतर नाशिक परिमंडळात दुसरे आयएसओ ९००१:२०१५ नामांकन मिळाले त्यानिमित्त आयोजित मेशी / दहिवड आयएसओ मानांकन कोनशिलाचे अनावरण १ डिसेंबर रोजी त्यांचे हस्ते करण्यात आले. कौतुक सोहळ्याप्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता दिपक कुमठेकर बोलत होते. या कार्याचा आदर्श घेऊन सर्वांनी आपल्या दैंनदिन कार्यात या प्रमाणेच उत्कृष्टतेचा ध्यास आणि सातत्य ठेवल्यास महावितरणची देदिप्यमान प्रगती होईल असा विश्वास मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मालेगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता जगदीश इंगळे, प्रमुख अतिथी म्हणून नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, पायाभूत आराखडा विभागाचे महेंद्र ढोबळे, कळवण विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज पाटील आणि जनसंपर्क अधिकारी विकास आढे व्यासपीठावर उपस्थित होते.
आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी येथील उपकार्यकारी अभियंता, यंत्रचालक, जनमित्र तथा सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले असून त्यामुळे मालेगाव मंडलामध्ये सर्वांमध्ये अभिमानस्पद भावना निर्माण झाली असून याचप्रकारे इतरही कार्यक्षेत्रात सर्वानी चिकाटीने व सातत्याने कार्यरत राहून मालेगाव मंडळातील सेवेचा दर्जा आणखी उंचवावा असे आवाहन मालेगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता जगदीश इंगळे यांनी केले.
आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांचे हस्ते देवळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे आणि सहाय्यक अभियंता घनश्याम कुंभार, वरिष्ठ यंत्रचालक दयाराम सोनवणे, यंत्रचालक हेमंत देवरे व मंगेश चव्हाण यांचा तसेच जनमित्रांचा सुद्धा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.
सोहळ्याला कार्यकारी अभियंते शैलेश जैन, सतिश बोंडे, संजय तडवी, श्यामकांत बोरसे व केशव काळूमाळी, वरिष्ठ व्यवस्थापक(विवले) रामेश्वर कुमावत आणि अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक देवळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे यांनी, कार्यक्रमाचे संचालन यंत्रचालक दयाराम सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन दहिवड उपकेंद्र सहाय्यक अभियंता कैलास शिवदे यांनी केले.