नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिह्यातील अवैध धंदे आणि गुटखा विक्री रोखण्यासाठी ग्रामिण पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली असून, ५ व्या मोहिमेंतर्गत महिनाभर वेगवेगळया पथकांनी ५५६ ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत ७५४ जणांच्या मुसक्या आवळत तब्बल २ कोटी १० लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जिह्यातील अवैध धंद्याबरोबरच प्रतिबंधीत गुटखा पोलिसांनी आपल्या रडारवर घेतला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून बेकायदा गुटखा विक्री वाहतूक आणि उत्पादन करणाºयांसह अवैध धंदेचालकांनाही पोलिसांनी पळता भुई थोडी केली आहे. अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे निहाय ही कारवाई सुरू असून दि.६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यानच्या ५ मोहिमेंतर्गत ग्रामिण पोलिसांनी गुटखा विरोधी ९३ कारवाया करून ९९ जणांना भादवी कलम ३२८ अन्वये अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ९८ लाख ७८ हजार २०४ रूपये किमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. यात चांदवड येथील कारवाईचा समावेश आहे. परराज्यातील एका आयशर ट्रकमधून ५० लाखाचा गुटखा वाहतूक करतांना पकडण्यात आला होता. या कारावाईत दोघाना बेड्या ठोकत पथकांनी सुमारे ७० लाख ८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. गुटख्या बरोबरच ५५६ ठिकाणी छापे टाकून अवैध धंदे उध्वस्त केले आहेत. दारूबंदी कायद्यान्वये ३४३ ठिकाणी कारवाया करीत पोलिसांनी ३४८ जणांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत ४४ लाख ९८ हजार ८६७ रूपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत केला आहे.
जुगार बंदी कायद्यान्वये ८७ ठिकाणी छापे टाकून जुगार अड्डे उध्वस्त केले. या कारवाईत २६० जुगारींना बेड्या ठोकत पोलिसांनी रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे १६ लाख ८५ हजार ४११ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. प्राणी संरक्षण कायद्यान्वये १९ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून याप्रकरणी २८ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या कारवाईत ४१ लाख ९६ हजार ०५० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जिवनावश्यक वस्तू कायद्यान्वये १० ठिकाणी छापे टाकून १५ जणांवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून ७ लाख ५० हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
एनडीपीएस कायद्यान्वये चार जणांविरूध्द ४ केसेस दाखल करण्यात आल्या असून या कारवाईत २९ हजार ९४५ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संपूर्ण महिनाभरात ५५६ केसेस दाखल करून पोलिसांनी ७५४ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत २ कोटी १० लाख ३८ हजार ९७७ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच जिह्यातील अपघात कमी होण्याच्या दृष्टीकोनातून वाहतूक पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक व वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी मोहिम हाती घेतली होती. महिनाभरात वाहतूक नियमांचे उलंघन करणा-या ४ हजार ४४२ वाहन चालकांविरूध्द कारवाई करून सुमारे ३१ लाख ३३ हजार ८५० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
या हेल्पलाईनवर माहिती कळवा
जिह्यातील अवैध धंदे संपुष्टात आणण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे. चोरीछुपी बेकायदा व्यवसाय सुरू असल्यास त्याबाबतची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यास अथवा ग्रामिण पोलिसांच्या ६२६२२५६३६३ या हेल्पलाईनवर कळवावी.
शहाजी उमाप, अधिक्षक पोलिस अधिक्षक नाशिक ग्रामिण