इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अलिबागः सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांची चर्चा झाली होती. लोकांच्या अडलेल्या कामांसाठी सत्तेत सहभागी व्हायचे होते; परंतु शरद पवार यांचे धरसोडीच्या आणि अविश्वासाच्या राजकारणामुळे अखेर आम्ही सत्तेत सहभागी झालो. त्याअगोदर शरद पवार यांनीच आम्हाला सत्तेत सहभागी व्हायची परवानगी दिली होती, असा गौप्यस्फोट आणि घणाघाती टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केली.
दोन दिवसांच्या अधिवेशनाचा समारोप करताना अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. शरद पवार यांनीच राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन करायला लावले, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, की आम्हाला सांगितले माझ्यानंतर सुप्रियाला अध्यक्ष करा. आम्ही त्याला तयारी दर्शवली. सर्व ठरले; पण तरीही त्यांचा धरसोडपणा सुरूच होता. आम्हाला गाफिल ठेवले जात होते.
राजीनामा मागेच घ्यायचा होता तर दिलाच कशाला, असा सवाल करून अजितदादांनी जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांची साक्ष काढली.
आम्ही सुप्रिया यांना बोलवून पवार साहेबांचे मत परिवर्तन करण्याची जबाबदारी सोपवली. त्यांनी आठ-दहा दिवस मागून घेतले. लोकशाहीत बहुमताचा आदर करावा लागतो. तरच संघटना पुढे जाते, असे सांगितल्यानंतर तिने साहेबांना कन्व्हिन्स करण्याची जबाबदारी घेतली. आमदारांच्या कामांना स्थगिती मिळाली आहे. सरकारमध्ये गेले पाहिजे, असा आमचा विचार त्यांना सांगितला, असे ते म्हणाले.
त्यानंतर काही दिवसांनी आम्ही थेट शरद पवार यांच्याकडे गेला. त्यांना आमचा विचार सांगितला. त्यांनी ऐकला. ते म्हणाले ठीक आहे. बघू काय करायचे ते; परंतु ते निर्णय घेत नव्हते. अखेर पुन्हा आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला गेलो. पुन्हा आम्ही म्हणणे मांडले. वेळ जातोय निर्णय घ्या, असे नंतर सांगितले. त्यानंतर शरद पवार यांनी मी राजीनामा देतो, तुम्ही सरकारमध्ये जा, असे सांगितल्याचा गौप्यस्फोट अजितदादांनी केला.
कुटुंबातील काही गोष्टी चर्चा कुटुंबात ठेवायच्या – जयंत पाटील
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध उभे रहा. ज्याच्यावर अन्याय झाला त्या मागे जा म्हणून शिकवण दिली आहे. पण काहीजण सत्तेत गेले अन ते पंचतारांकित हॉटेल मध्ये बैठका घेत आहे असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, कुटुंबातील काही गोष्टी चर्चा कुटुंबात ठेवायच्या असतात त्या चर्चा बाहेर सांगायच्या नसतात हे चांगल्या मुलाचे लक्षण नाही असे सांगत त्यांनी असा अजित दादा पवार यांना चिमटा घेतला. कर्जत येथे पक्षांतर्गत चर्चा बाबत केलेल्या गौप्य स्फोटाचे पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या सरकार मध्ये एकवाक्यता नाही मुख्यमंत्री वेगळे बोलतात तर यांचे मंत्री वेगळेच बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मराठा ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.