नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोड आणि म्हसोबानगर भागात प्रतिबंधीत गुटख्याची विक्री करणा-या दोघा पानस्टॉल चालकांना पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. संशयितांच्या ताब्यातून सुमारे साडे तीन हजार रूपये किमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.
राज विजय मानकर (२३ रा.मायको हॉस्पिटल मागे,कालिकानगर) व अभिषेक शंकर शेट्टी (२७ रा.तन्मय सोसा.दत्तनगर,पेठरोड) अशी अटक करण्यात आलेल्या पानस्टॉल चालकांची नावे आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने शहरात गुटखा विरोधी मोहिम हाती घेण्यात आली असून, सर्वत्र छापासत्र सुरू आहे.
यापार्श्वभूमिवर वेगवेगळया पथकांनी पंचवटी परिसरात छापेमारी केली. त्यात म्हसोबा नगर मंदिरासमोरील नंदा पान बिडी शॉप येथे व दिंडोरीरोडवरील मार्केट यार्ड समोरील साईप्रसाद पान शॉप मध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. दोघा पानस्टॉल चालकांना अटक करून सुमारे ३ हजार ५७६ रूपये किमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक परदेशी करीत आहेत.