दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरीत रणशिंग फुंकले असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य ट्रॅक्टर रॅली काढत शेतकरी आक्रोश मोर्चा काढला.
दिंडोरी येथील कादवा पेट्रोल पंप येथून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेसह आमदार सुनील भुसारा, दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रेय पाटील, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, गोकुळ पिंगळे, गजानन शेलार, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, जिल्हाध्यक्ष शाम हिरे अनिल देशमुख आदी सर्व नेते ट्रॅक्टरवर स्वार होत भव्य मोर्चा काढण्यात आला. जयंत पाटील हे स्वतः ट्रॅक्टर चालवत अग्रभागी होते.कर्जमाफी झालीच पाहिजे,नुकसान भरपाई द्या.भाजप सरकारचा धिक्कार असो. शरद पवारांचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा अशा घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले त्यानंतर संस्कृती लॅान्स येथे मोर्चाचे विसर्जन होत सभा झाली.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत होतो त्यावेळी शेतकरी कुऱ्हाडीने द्राक्षाची झाडे तोडत होता. तीन – साडे तीन लाख खर्च करून जर एक रुपयाही मिळणार नसेल तर नको हे पीक असे ही शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे. परिस्थितीत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पूनर्गठन केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे धोरण आखले पाहिजे. या सरकारने अर्धवट दुष्काळ जाहीर केला आहे. काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे असं सरकार म्हणतंय. जिथं दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे तिथं शेतकऱ्यांना वीजबिल माफ केले जाणार का? विद्यार्थ्यांना फी माफ केली जाणार का? सरकारने कोणत्याही नियम व अटी न ठेवता सरसकट दुष्काळ जाहीर करावा व सर्वांना सर्व सवलती द्याव्यात ही आमची मागणी आहे.
यावेळी राष्ट्रवादी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड,आमदार सुनील भुसारा, माजी आमदार शिरीष कोतवाल,नितीन भोसले,साहेबराव पाटील,तालुकाध्यक्ष भास्कर भगरे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पाटील यांची भाषणे झाली. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण,दीपिका चव्हाण, गोकुळ पिंगळे,तिलोत्तमा पाटील,मविप्र संचालक प्रवीण जाधव,राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,जिल्हाध्यक्ष शाम हिरे,शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पिंगळ,माकप चे इंद्रजित गावित, कादवा चे व्हा. चेअरमन शिवाजी बस्ते,सर्व संचालक,राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष संगीता ढगे तालुकाध्यक्ष शैला उफाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कादवा चे संचालक बाळासाहेब जाधव यांनी जयंत पाटील यांचे स्वागत केले. आभार दिंडोरी शहराध्यक्ष नरेश देशमुख यांनी मानले. सभेनंतर जयंत पाटील यांनी शेतकऱ्यानं समवेत जेवणाचा आस्वाद घेतला.