नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्थिक देवाण घेवाणीतून संगमनेर येथील तिघांनी मालट्रकसह चालक आणि क्लिनरचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना नाशिक साखर कारखाना भागात घडली असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष खेमनर (रा.साकुर), शिवाजी कुदनर व पाराजी कुदनर (रा.दोघे शिंदोडी ता.संगमनेर) अशी संशयित अपहरणकर्त्यांची नावे आहेत. याप्रकरणी युवराज पांडूरंग पोळ (३४ रा.चिमणी बारव खडकवाडी ता.पारनेर जि.अ.नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेत योगिराज पांडूरंग पोळ व बाळासाहेब दिलीप बा-हुडे या ट्रक चालक व क्लिनरचे अपहरण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
संशयित व पोळ यांच्यात आर्थिक व्यवहार असून त्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. पोळ यांचा ऊस वाहतूकीचा व्यवसाय असून ते बुधवारी (दि.२९) मालट्रक एमएच १२ एचडी ००९४ घेवून नाशिक कारखाना आवारात दाखल झाले असता ही घटना घडली. संशयितांनी चालक व क्लिनरला दमदाटी करीत मालट्रकसह पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप करीत आहेत.
तडीपाराला पोलिसांनी केले गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तडिपार असतांनाही शहरात वावर ठेवणा-या गुंडावर पोलिसांनी कारवाई केली. संशयित द्वारका भागात मिळून आला असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाजीद अब्दूल वाहीद चौधरी (३० रा.नानावली भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. याबाबत पोलिस कर्मचारी दयानंद सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. चौधरी याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर पोलिसांनी दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. शहर आणि जिह्यातून त्यास तडिपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच होता. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच बुधवारी (दि.२९) रात्री तो द्वारका भागातील ट्रॅक्टर हाऊस परिसरात मिळून आला. अधिक तपास हवालदार बाविस्कर करीत आहेत.