नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इडिया यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक आणि नाशिक विभाग क्रीडा उपसंचालक यांच्या वतीने नाशिकमध्ये दिनांक २ ते ८ डिसेंबर, २०२३ दरम्यान १७ वर्षे मुले आणि मुली आणि १२ ते १८ डिसेंबर दरम्यान १९ वर्षे मुले आणि मुली यांच्या शालेय राष्ट्रीय खो – खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मॅटवर स्पर्धा होणार :- या स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथील मैदानावर करण्यात आले आहे. स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे या स्पर्धा मॅटवर खेळविण्यात येणार आहेत. यासाठी मॅटचे चार क्रीडांगणे तयार करण्यात येत आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, खो-खो चे संघटक मंदार देशमुख, महाराष्ट्राच्या संघाचे प्रशिक्षक सत्यम जाधव आणि गुरुदत्त चव्हाण, आनंद खरे, अविनाश खैरनार, भाऊसाहेब जाधव, संदीप ढाकणे आदी उपस्थित होते. यावेळी सौ. सुनंदा पाटील यांनी या स्पर्धेसंदर्भात माहिती दिली.
३ ते ७ डिसेंबर दरम्यान १७ वर्षे मुले आणि मुली यांच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत २८ राज्यांचे संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये १५३६ खेळाडू आणि १२८ पंच, व्यवस्थापक, प्रशिक्षक, पदाधिकारी यांचा समावेश असणार आहे. या स्पर्धा लीग पद्धतीने आणि त्यांनंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत.
निवास आणि भोजन स्थानिक प्रवास व्यवस्था :- खेळाडूं, प्रशिक्षिक, व्यवस्थापक पदाधिकारी यांची निवास आणि भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. संपूर्ण भारतातून येणाऱ्या खेळाडूंसाठी नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून ते निवास स्थळापर्यंत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेला नाशिकचे पालक मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. दादाजी भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, ना. नरहरी झिरवळ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दिनांक ०३ डिसेंबर रोजी होणार असून स्पर्धा दिनांक ३ ते ७ डिसेंबेरपर्यंत सुरू राहणार आहेत. स्पर्धेचा कालावधी सकाळी ०८.०० ते ११. ०० आणि दुपारी ०३.३० ते रात्री ०८.०० असा असणार आहे. या स्पर्धेची तांत्रिक बाजू स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नियुक्त केलेले अधिकृत पंच पार पडणार आहेत. स्पर्धेत लाईव गुणफलक असणार आहे. तर या स्पर्धेच्या प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण यू ट्यूब चॅनलवर केले जाणार आहे.या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन व्हावे यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष जलज शर्मा, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील, आणि अविनाश टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, महेश पाटील, संदीप ढाकणे आणि इतर सहकारी कार्यरत आहेत. या स्पर्धेसाठी मॅटचे क्रीडांगण तयार करण्याची जबाबदारी मंदार देशमुख आणि उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. तरी नाशिकच्या जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.