नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात शाळेच्या संगणक कक्षाचे कुलूत तोडून चोरट्यांनी दोन संगणक चोरून नेल्याचा प्रकार घडला. या घटनेत सुमारे २० हजार रूपये किमतीचे संगणक चोरट्यांनी पळविले असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार के.के.वाघ इग्लिश स्कूल शिवाजीनगर येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी मुख्याध्यापिका मिनाक्षी पवार यांनी फिर्याद दिली आहे. गेल्या ९ सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या संगणक कक्षाचे कुलूप तोडून दोन संगणक चोरून नेले. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.
३५ वर्षीय इसमाने केली आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात राहणा-या ३५ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहूल सोमनाथ पाटील (रा.कुमावत गल्ली,अशोकनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पाटील यांनी गुरूवारी (दि.३०) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत योगेश पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक गावीत करीत आहेत.