इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरः मराठा आरक्षणाला ओबीसीतून विरोध केल्यामुळे मराठा आंदोलकांच्या निशाण्यावर आले असताना त्यांना सातत्याने धमक्या येत आहेत. आज त्यांना मोबाईलवर आलेले फोन त्यांनी घेतले नाहीत, म्हणून त्यांना धमकीचे ११ मेसेज आले आहेत.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी आले होते. या वेळी त्यांच्या मोबाईलवर कुणीतरी सारखे कॉल करीत होते; परंतु भुजबळ यांनी ते घेतले नाहीत. त्याचा राग आल्याने त्यांना धमकी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुजबळ यांनी मराठा समाज तसेच आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात भाष्य केले होते. मराठा समाजास वेगळे आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली होती. ओबीसी समाजाच्या भुजबळ हे राज्यभर एल्गार सभा घेत आहेत. मराठा आरक्षणाविरोधी भुजबळ भूमिका घेत असल्याचा आरोप आहे. आज भुजबळ यांना सौदागर सातनाक नावाच्या व्यक्तीच्या क्रमांकावरून धमकी आली. भुजबळ यांना धमकी प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भुजबळ यांच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. फोन करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.