इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : मुख्यमंत्र्याना अपशब्द वापरल्याच्या आरोपातील मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्या जामीनअर्जावर गुरुवारी युक्तीवाद झाला. पण, न्यायालयाची वेळ संपल्यामुळे आज त्यावर निकाल देण्यात आला. त्यात दळवी यांना न्यायालयाने दिलासा दिला. त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. आरोपी वरिष्ठ नागरिक असून त्यांना काही आजार देखील आहेत. तसेत ते पळून जाण्याची भीती नाही म्हणून जामीन मंजूर करण्यात आल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द वापरल्या प्रकरणी दत्ता दळवींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर दळवी यांच्या जामीनअर्जावर महानगर दंडाधिकारी एम. आर. वाशिमकर यांच्या समोर गुरुवारी सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला. दळवी यांच्या वकिलांनी ते जबाबदार नागरिक असल्याचा युक्तिवाद केला. त्यांनी दोन पक्षात असलेल्या अंतर्गत वादामुळे हे वक्तव्य केले. ते मुंबईचे रहिवासी आहेत. पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालय जामीनअर्जावर निकाल देणार होते; परंतु न्यायालयाचे कामकाज संपल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आला. आज तो देण्यात आला. त्यात दळवी यांना दिलासा मिळाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपामुळे संतप्त झालेल्या शिंदे समर्थकांनी दळवी यांच्या गाडीची तोडफोड केली. दळवी यांच्या घराच्या परिसरात गाडीची तोडफोड करण्यात आली. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक अशी दळवी यांची ओळख आहे. ईशान्य मुंबईत त्यांचा प्रभाव आहे.