इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली- भारत सरकारने ९७ अतिरिक्त तेजस विमाने आणि १५६ लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. दोन्ही विमाने स्वदेशी विकसित आहेत आणि हा करार १.१ लाख कोटी रुपयांचा आहे.
भारतीय हवाई दलासाठी तेजस मार्क १-ए लढाऊ विमानांची मागणी करण्यात आली असून हवाई दल आणि लष्करासाठी हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. संरक्षण परिषदेने अतिरिक्त सौद्यांनाही मंजुरी दिली असून एकूण सौद्यांची किंमत सुमारे दोन लाख कोटी रुपये असेल. भारताच्या इतिहासातील स्वदेशी उत्पादकांसाठी ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. एकदा अंतिम किंमतीच्या वाटाघाटी झाल्यानंतर अंतिम साइन ऑफ कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी करेल. ही विमाने लष्करात सामील होण्यासाठी किमान दहा वर्षे लागू शकतात.
सुखोई एसयू-३० एमकेआय विमानाचे मोठे अपग्रेडदेखील मंजूर होण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवाई दलाकडे २६० पेक्षा जास्त एसयू-३० विमाने आहेत. भारताने विकसित केलेल्या रडार, एव्हिओनिक्स आणि उपप्रणालींसह अपग्रेड स्वदेशी असणे अपेक्षित आहे. संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली, तेजस एमके-१ए लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट हे स्वदेशी बनावटीचे आणि चौथ्या पिढीतील लढाऊ विमान आहे.