इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अलिबाग : राजकारणात परिस्थिती पाहून निर्णय घ्यायला लागतो. कुठलाही पक्ष त्याला अपवाद नाही. हातावर हात ठेऊन विरोध करण्यात मला स्वारस्य नाही. सत्तेत सहभागी होऊन जनतेची कामे करणे महत्त्वाचे आहे. सरकारमध्ये सहभागी झालो असलो, तरी पक्षाचा विचार सोडलेला नाही, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
कर्जत येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवशीय अधिवेशनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते. ते म्हणाले, की प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे; परंतु त्याचबरोबर आपल्या म्हणण्यामुळे इतरांच्या भावना दुखावणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. समाजात तेढ निर्माण होणार नाही, हे पाहायला हवे. जाती-जातीत वाद निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. मराठा समाज आणि धनगर समाजाला आरक्षण हवे आहे. इतरांना दिलेल्या आरक्षणाला धक्का न लावता, या समाजांना आरक्षण द्यायला हवे यावर सर्वांचे एकमत आहे. तशी पाऊले सरकार उचलत आहे.
विरोधक रोज काहीतरी वल्गना करतात. त्यांच्यी टीकेला किंवा त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही, असे सांगून अजितदादा म्हणाले, की राज्य सरकारच्या माध्यमातून चार हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. एक लाख जागांवर भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल. विमाकंपन्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना सरकार ही मदत करणार आहे.