नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले असून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनस्तवर विशेष निधीकरीता तसेच अवकाळीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी क्रॉप कव्हर योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज येवला व निफाड तालुक्यातील वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीकांच्या नुकसानीची पाहणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी समवेत उपविभागीय अधिकारी येवला बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी निफाड हेमांगी पाटील, येवला तहसिलदार आबा महाजन, निफाड तहसिलदार शरद घोरपडे, येवला तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, निफाड तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे जलदगतीने करण्यात यावेत यात एकही बाधित शेतकरी सुटता कामा नये. बाधित शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शालेय शिक्षण फी माफीबाबतही योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. बाधित क्षेत्राचा विचार करता पीक विम्याबाबत सुध्दा शासन स्तरावरून प्रयत्न करणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना अश्वासित केले. ‘खचून जाऊ नका’ अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी बाधित शेतकऱ्यांना धीर दिला.
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अवकाळीग्रस्त शेतीची पाहणी करत असतांना महिला शेतकऱ्यांना आपले अश्रू अनावर झाले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी धीर धरा, खचून जाऊन नका सरकार आपल्या सोबत असून शासनाच्या वतीने जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास देत त्यांना धीर दिला.
आज मंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील कातरणी, सोमठाण देश व निफाड तालुक्यातील वेळापूर, पिंपळगाव नजिक, वनसगांव या गावांत वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीकांच्या नुकसानीची पाहणी केली.
ही राजकारण करण्याची वेळ नाही, ही वेळ आहे लोकांचे अश्रू पुसण्याची – मंत्री छगन भुजबळ
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असतांना ही राजकारण करण्याची वेळ नाही, तर त्यांना धीर देऊन त्यांचे अश्रू पुसण्याची वेळ आहे. यामध्ये सर्वच पक्षांनी कुठलही राजकारण न करता एकत्र येऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी अधिकाऱ्यांसमवेत सत्य परिस्थिती समजून घेण्यासाठी आपण पाहणी केली आहे. राजकारण करणारे राजकारण करत असतात आज ज्यांनी विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला. त्यामधील काही लोक हे त्या गावातील देखील नव्हते. त्यामुळे त्यांचा होणारा विरोध हा राजकीय असून मतदारसंघातील जनता आपल्या सोबत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या या वेळी त्यांना धीर देणे अतिशय महत्वाचे असून या कुणीही राजकारण आणू नये हीच अपेक्षा असेल्याचे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.