पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोट्यवधी रुपयांची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करीत असलेल्या स्वायत्त महाविद्यालयांना शुल्क भरा अन्यथा कठोर कारवाईस सामोरं जा असा इशारा आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिला आहे. बुधवारी थकबाकीदार स्वायत्त महाविद्यालयांना नोटीस बजावा. थकबाकी न भरल्यास अशा महाविद्यालयांना विद्यापीठाचे नाव, लोगो वापरण्यास बंदी घालण्यासह कठोर कारवाई करा असा ठराव एकमताने संमत करण्यात आला.
विद्यापीठाशी संबंधित असलेल्या पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी स्वायत्त (आटोनोमस) दर्जा मिळवला आहे. दिवसेंदिवस ही संख्याही वाढते आहे. स्वायत्त महाविद्यालय स्वतःच्या परीक्षा स्वतः घेतात. स्वतःचे नवे कोर्सेसही तयार करतात. मात्र या सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पदवी, गुणपत्रिका, वेळापत्रक, सर्व प्रकारचे प्रमाणपत्रे हे विद्यापीठाचे मिळतात. स्वायत्त दर्जा मिळवताना शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या शुल्कातील १० ते १५ टक्के रक्कम महाविद्यालयांनी विद्यापीठाला जमा करणे नियमानुसार अपेक्षित आहे. तशी अट घालूनच नियमानुसार स्वायत्त दर्जा मंजूर केला जातो.
मात्र स्वायत्त दर्जा मिळाल्या नंतर अनेक महाविद्यालयांनी अनेक वर्षांपासून हे शुल्क विद्यापीठाला जमा केलेले नाही. त्यामुळे विद्यापीठाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल थकीत आहे. कधी राजकीय दबाव तर कधी कायदेशीर लढाईचे इशारे देऊन काही संस्था विद्यापीठाला याबाबतीत विद्यापीठाल दाद लागु देत नाही. अशा संस्थावर शासन नियमानुसार कारवाई करावी असा ठराव बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषद समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
काही संस्थांच्या महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा देण्याचा ठराव आल्यानंतर याबाबतीत सखोल चर्चा झाली. विद्यापीठाची पुण्याई ही या महाविद्यालयांना मिळते. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा डेटाही कायमस्वरूपी विद्यापीठ सांभाळते. त्यांचे शिक्षणानंतरचे सर्व कागदोपत्री सोपस्कार ही विद्यापीठाची जबाबदारी होऊन जाते. पण संपूर्ण शुल्क मात्र स्वायत्त संस्था घेते हे योग्य नाही अशी भूमिका सदस्यांनी घेतली. आणि थकबाकी ठेवणाऱ्या स्वायत्त संस्थाना तंबी देऊन नियमानुसार कठोर कारवाई करावी असा निर्णय घेण्यात आला. सदरच्या चर्चेत व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र विखे पाटील, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, सागर वैद्य, बागेश्री मंठालकार, रवींद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ.घोरपडे, प्राचार्य वायदंडे, संगीता जगताप, धोंडीराम पवार, पालवे आदींनी आपली मते मांडली. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रकुलगुरु डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी विद्यापीठाची भूमिका विषद केली.
शुल्क भरावे अशी विद्यापीठाची रास्त अपेक्षा
विद्यापीठाकडे मर्यादित उत्पन्नाची साधने आहे. स्वायत्त महाविद्यालयांनी अशी थकबाकी ठेवल्यास विद्यापीठाच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होऊन महसुलात घट होते. ज्यामुळे विद्यार्थी विकासाच्या अनेक योजनांवरही नकारात्मक परिणाम होतो. स्वायत्त महाविद्यालयांनी नियमानुसार शुल्क भरावे अशी विद्यापीठाची रास्त अपेक्षा आहे.
सागर वैद्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ